मुंबई : कांदिवली पूर्व येथे कुत्रीवर लैंगिक अत्याचार झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली. या प्रकरणी पेटा इंडिया या प्राणीमित्र संघटनेने समता नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणातील आरोपी एका नाल्यात कुत्रीसोबत आढळला. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम ३२५, तसेच प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

कांदिवली परिसरात कुत्रीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली. ही घटना १ फेब्रुवारी रोजी रात्री उघडकीस आली. प्राणी मित्र अंकिता काळे यांनी या प्रकरणी पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल्स इंडिया अर्थात पेटा इंडिया या संस्थेकडे या प्रकरणी तक्रार केली होती. पेटा संस्थेने समता नगर पोलीस ठाण्याशी समन्वय साधून या प्रकरणात गुन्हा नोंदवला. अंकिता काळे यांच्या जबाबावरून आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३२५, तसेच प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा १९६० मधील कलम ११(१) (अ) आणि (१) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

ही घटना रविवारी १ फेब्रुवारी रोजी रात्री ११.४५ च्या सुमारास घडली असून एक व्यक्ती एका नाल्यात मादी कुत्रीसोबत आढळून आला. अंकिता काळे आणि स्थानिक रहिवाशांना संशयास्पद प्रकार वाटल्याने त्यांनी याबाबत अग्निशमन दल व पोलिसांना माहिती दिली. अग्निशमन दलाच्या मदतीने आरोपी आणि कुत्रीला नाल्यातून बाहेर काढण्यात आले. त्यावेळी आरोपीच्या चेहऱ्यावर रक्त होते, मात्र त्याच्या शरीरावर कोणतीही जखम दिसत नव्हती. याच वेळी कुत्री अत्यंत घाबरलेली व थरथरत असल्याचे अंकिता काळे यांच्या निदर्शनास आले, असे जबाबात म्हटले आहे. त्यानंतर या कुत्रीला परळ येथील बॉम्बे व्हेटरनरी कॉलेजमध्ये नेण्यात आले, जिथे तिची वैद्यकीय-न्यायवैद्यकीय तपासणी करण्यात आली. सध्या ती एका खाजगी पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल असून तज्ज्ञांच्या देखरेखीखाली आहे. ती अत्यंत मानसिक धक्क्यात असून,अन्न घेत नाही आणि हालचालही करत नाही, अशी माहिती पेटा इंडियाच्या स्वयंसेवकांनी दिली.

पेटा इंडियाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भारतीय न्याय संहितेत (BNS) दुरुस्ती करून प्राण्यांवरील लैंगिक अत्याचार करणाऱ्याला शिक्षा देण्याबाबत तरतूद करण्याची मागणी केली. भारतीय दंड संहिता १८६० मधील कलम ३७७ अंतर्गत प्राण्यांवरील लैंगिक अत्याचार गुन्हा मानला जात होता, मात्र भारतीय न्याय संहितेतमध्ये प्राण्यांना तेवढेच संरक्षण देणारी कोणतीही तरतूद नाही. कलम ३७७ नुसार प्राण्यांवरील लैगिक अत्याचार अजामीनपात्र गुन्हा होता आणि त्यासाठी आजीवन कारावास किंवा दहा वर्षांपर्यंत कारावास व दंड अशी शिक्षा होती, असे पेटाचे कायदेशीर सल्लागार मीत आशर यांनी सांगितले.