मुंबई उच्च न्यायालयानं अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांना जामीन दिलाय. या सर्वांना मुंबई क्रुझ ड्रग्ज प्रकरणात हा जामीन मिळाला. या सुनावणीकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं. सर्वांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने जामिनावर अंतिम निर्णय दिला. त्यामुळे आर्यन खानची दिवाळी तुरुंगात न जाता आपल्या घरी ‘मन्नतवर’ जाणार हे स्पष्ट झालंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आर्यन खानची बाजू मांडण्यासाठी भारताचे माजी अॅटर्नी जनरल आणि ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांच्यासह ज्येष्ठ वकील सतीश मानेशिंदे न्यायालयात हजर होते. तिन्ही आरोपींच्या वकिलांनी जामिनासाठी न्यायालयासमोर युक्तिवाद केल्यानंतर आज एनसीबीच्यावतीने अतिरिक्त सॉलिसीटर जनरल (ASG) अनिल सिंग यांनी बाजू मांडली. त्यावर रोहतगी यांनी पुन्हा युक्तिवाद केला. यानंतर न्यायालयाने निर्णय सुनावला.

जामीन मिळूनही आर्यनला आजची रात्र तुरुंगात काढावी लागणार

न्यायालयाने तिन्ही आरोपींना जामीन दिला असला तरी ते आजच तुरुंगाबाहेर येऊ शकणार नाहीत. न्यायालयाने जामीन मंजूर केला असला तरी त्याचं निकालपत्र आणि जामिनाच्या अटी यावर शुक्रवारी (२९ ऑक्टोबर) अंतिम निर्णय होईल. यानंतरच तिघे तुरुंगाबाहेर येऊ शकतील.

आर्यन खानसाठी रोहतगी यांनी काय युक्तिवाद केला?

वरिष्ठ वकील मुकुल रोहतगी म्हणाले, “अरबाजकडे काही आहे की नाही याविषयी आर्यनला कोणतीही माहिती नव्हती. वादासाठी हे माहिती होतं असं मानलं तरी सामूहिकपणे व्यावसायिक स्तरावरील ड्रग्जची मात्रा सापडलं इतकंच म्हणू शकता. त्याला एनसीबी षडयंत्र म्हणत आहे. आर्यनविरोधातील कलम २७ अ हटवण्यात आलेलं नाही. आर्यनसोबतच्या ५-८ लोकांकडील ड्रग्जची बेरीज करून त्याला व्यावसायिक मात्रा म्हटलं जातंय.”

“क्रुझ शिपवर एकूण १३०० लोक, मग केवळ आर्यन आणि अरबाजचा संबंध कसा?”

“क्रुझ शिपवर एकूण १३०० लोक हजर होते. असं असताना एनसीबीने केवळ आर्यन आणि अरबाजमध्येच संबंध असल्याचं सांगितलंय. हा षडयंत्राचा आरोप योगायोग नाही, तर कटाचा भाग आहे. जहाजावर कुणाच्याही भेटीगाठी झालेल्या नाहीत त्यामुळे याला षडयंत्र म्हणता येणार नाही. हे सर्व एकत्र भेटणार आहेत, तेथे त्यांना ड्रग्ज मिळणार आहे आणि मग ते ड्रग्जचं सेवन करणार आहेत अशी चर्चा नाही. त्यामुळेच हा कट आहे,” असं मत रोहतगी यांनी व्यक्त केलं.

“जहाजावर कोणत्याही भेटीगाठी नाही, त्यामुळे षडयंत्र म्हणता येणार नाही”

“जर एखाद्या हॉटेलमध्ये वेगवेगळ्या रूममध्ये लोक आहेत. त्यांनी ड्रग्जचं सेवन केलं तर ते सर्व लोक षडयंत्राचा भाग आहेत असं म्हणता येईल का? या प्रकरणात षडयंत्र म्हणावं असा कोणताही पुरावा नाही. आर्यन केवळ अरबाजला ओळखत होता. याशिवाय इतर कुणालाही ओळखत नाही. तेथे सर्वांची भेट झाली हे सिद्ध करणं कठीण आहे. मात्र, वास्तवाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. षडयंत्र आहे हे दाखवण्यासाठी बैठक किंवा भेट होणं गरजेचं आहे. तिथं जाणीवपूर्वक ६ ग्रॅम ड्रग्ज सोबत बाळगलं असू शकतं. त्याचा षडयंत्राशी काहीही संबंध नाही.” असंही मुकुल रोहतगी यांनी नमूद केलं.

एनसीबीच्या वकिलांनी काय युक्तिवाद केला?

अनिल सिंग म्हणाले, “आर्यन खान ड्रग्जचं नियमित सेवन करत होता. हे सिद्ध करण्यासाठी आमच्याकडे पुरेसे पुरावे आहेत. आर्यनने जाणीवपूर्वक ड्रग्ज बाळगले होते. दोन व्यक्ती सोबत आहेत, त्यातील दुसऱ्याला ड्रग्ज असल्याचं माहिती आहे. त्याने ड्रग्ज घेतले तर पहिला व्यक्तीने जाणीवपूर्वक ड्रग्ज बाळगले असा अर्थ निघतो. आर्यन आणि अरबाज बालपणापासूनचे मित्र आहेत. ते सोबत फिरले आणि एकाच रूममध्ये राहिले.”

“आरोपींचे वकील ड्रग्ज सेवन केलं होतं की नाही हे स्पष्ट होण्यासाठी वैद्यकीय चाचणी का केली नाही असा युक्तीवाद करत आहेत. मात्र, आमचा आरोप सेवनाचा नाही, तर ड्रग्ज बाळगल्याचा आहे. आर्यन खानने सेवनाच्या उद्देशाने ड्रग्ज बाळगले. हे प्रकरण सेवन करण्याच्या उद्देशानं जाणीवपूर्वक ड्रग्ज बाळगण्याचं आहे. आरोपींकडे व्यावसायिक स्तरावरील ड्रग्जची मात्रा सापडलीय. सर्व ८ आरोपींकडे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्ज सापडले. याची एकूण मात्रा पाहिली असता यात व्यापक विक्रीचा कट दिसतो,” असं अनिल सिंग म्हणाले.

“गांधी जयंती असल्यानं कारवाई करायला नको होती का?”

“व्हॉट्सअॅपच्या चॅटवर आक्षेप घेता येणार नाही, कारण आमच्याकडे आरोपींचे ६५ ब प्रमाणे घेतलेले जबाब आहेत. त्या क्रुझ शिपवर पार्टीचं आयोजन केलं होतं आणि माझे अशील आरोपींना २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीच्या दिवशी अटक केल्याचं सांगत आहेत. तो कोरडा दिवस होता म्हणून आम्ही त्यांना जाऊ द्यावं लागत होतं” असं म्हणत अनिल सिंग यांनी आरोपींच्या वकिलांना टोला लगावला.

“अरबाजने स्वतः आपल्या बुटातून ड्रग्ज काढून एनसीबीकडे दिले”

सिंग म्हणाले, “आरोपी आमच्याकडे ड्रग्ज सापडले नाही असा युक्तिवाद करत आहे. मात्र, पंचनामा पाहिला तर अरबाजकडे ड्रग्ज सापडले आहेत. अरबाजने स्वतः आपल्या बुटातून ड्रग्ज काढून एनसीबीच्या ताब्यात दिले होते. आरोपी क्रुझ शिपवर ‘ब्लास्ट’ करण्यासाठी जात होते असं चॅटमध्ये म्हटलंय. क्रुझवर २ दिवसांसाठी सेवन करण्यासाठीच त्यांनी सोबत चरस बाळगलं. अरबाजकडे ते सापडले.”

आतापर्यंत नेमकं काय झालं?

दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयात २६ आणि २७ ऑक्टोबरला आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांच्या जामीन अर्जांवर सुनावणी झाली. या सुनावणीमध्ये तिघांच्याही वकिलांनी जामीन देण्यासाठी युक्तीवाद केला. आता एनसीबीच्या वतीने वकील आपली बाजू मांडतील आणि त्यावर उच्च न्यायालय आपला निर्णय देईल.

या प्रकरणी विशेष न्यायालयाकडून २ आरोपींना जामीन मंजूर

२ ऑक्टोबरला एनसीबीनं मुंबईत कॉर्टेलिया क्रूझवर छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईदरम्यान, एनसीबीनं एकूण ८ लोकांना अटक केली. अटकेची कारवाई झाल्यापासून हे सर्वजण तुरुंगातच असून त्यांच्या जामीन याचिकांवर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मुंबईतील विशेष न्यायालयामध्ये यासंदर्भात सुनावणी सुरू असताना मंगळवारी (२६ ऑक्टोबर) दोन आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला. या प्रकरणामध्ये पहिल्यांदाच आरोपींना जामीन मिळाला.

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांचे जामीन अर्ज विशेष एनडीपीएस न्यायालयाने फेटाळून लावले होते. त्यानंतर या तिघांनी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल केली. त्यांच्या अर्जांवर २६ आणि २७ ऑक्टोबरला सुनावणी झाली. आज पुन्हा यावर सुनावणी होत आहे. दुसरीकडे एनडीपीएस न्यायालयात देखील या प्रकरणातील इतर आरोपींच्या जामीन अर्जांवर सुनावणी सुरू आहे. याच सुनावणीमध्ये दोन आरोपींना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

हेही वाचा : Aryan Khan Drugs Case : आर्यन खानला आजही जामीन नाहीच, उद्या पुन्हा होणार सुनावणी

यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, मनीश राजगरिया आणि आविन साहू या दोघा आरोपींना विशेष एनडीपीएस न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात जामीन मिळालेले ते पहिलेच आरोपी आहेत. यातील एक सहआरोपी मनिष राजगरियाचे वकील अजय दुबे यांनी पत्रकारांना याची माहिती दिली आहे. मुंबई शहरातील विशेष एनडीपीएस न्यायायाने मनीष राजगरियाला जामीन मंजूर केल्याची माहिती त्यांनी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shahrukh khans son aryan khan bail latest updates 28th october 2021 mumbai cruise drug case news pbs
First published on: 28-10-2021 at 14:47 IST