Shakti Mill Gangrape: आरोपींची फाशीची शिक्षा रद्द; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय

शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने विजय जाधव, कासीम बंगाली, सलिम अंसारी यांना फाशीची शिक्षा सुनावली होती

मुंबईसह संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणी आज मुंबई हायकोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. हायकोर्टाने तीन आरोपींची फाशीची शिक्षा रद्द केली असून शिक्षेचे रूपांतर जन्मठेपेत केलं आहे. २०१३ मधील या प्रकरणातील आरोपींनी फाशीच्या शिक्षेला आव्हान दिलं होतं. घटना घडली तेव्हा लोकांचा रोष अधिक होता. पण कायद्याचा विचार करता हे प्रकरण फाशीचे नाही असं कोर्टाने यावेळी नमूद केलं.

आरोपींनी मुंबई सत्र न्यायालयाने ४ डिसेंबर २०१४ ला या सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला आव्हान दिलं होतं. हायकोर्टाने ही याचिका फेटाळून लावली होती. आरोपींची शिक्षा निश्चित करण्यासंबंधीचा निर्णय हायकोर्टाने राखून ठेवला होता. दरम्यान आज निर्णय सुनावताना कोर्टाने फाशीची शिक्षा रद्द केली असून शिक्षेचे जन्मठेपेत रूपांतर करण्याचा निर्णय दिला.

शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाने विजय जाधव, कासीम बंगाली, सलिम अंसारी यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. या तिघांनी मुंबई हायकोर्टात याचिका केली होती.

कोर्टाने निकाल सुनावताना काय म्हटलं –

“या घटनेने समाजाला खूप मोठा धक्का दिला. बलात्काराची प्रत्येक घटना ही खूप मोठा गुन्हा आहे. यामुळे फक्त शारिरीक नाही तर मानसिक आरोग्याला हानी पोहोचते. पीडितेच्या सन्मानावर हा हल्ला असतो. पण घटनेवर चालणारं कोर्ट लोकांच्या मतांच्या आधारे शिक्षा ठरवू शकत नाही. नियमाप्रमाणे जन्मठेपेची शिक्षा असून, फाशी हा एक अपवाद आहे. त्यामुळे योग्य विचार करुन निर्णय घेतला पाहिजे. अशा घटनांमध्ये प्रक्रिया विसरुन चालणार नाही,” असं कोर्टाने यावेळी सांगितलं.

“फाशीची शिक्षा रद्द करताना आम्ही प्रक्रियेचं पालन केलं आहे,” असं कोर्टाने यावेळी स्पष्ट केलं. पुढे सांगितलं की, “आरोपी जन्मठेपेच्या शिक्षेस पात्र आहेत. महिलांकडे एक वस्तू म्हणून पाहणारे हे आरोपी नैसर्गिक मृत्यू होईपर्यंत जन्मठेपेच्या शिक्षेस पात्र आहेत”.

“आरोपींनी दिलेली कबुली आणि पीडित तरुणी वासनेचा विषय होता अशी टिप्पणी यावरून त्यांच्यात सुधारणा होण्यासाठी वाव नसल्याचं दिसून येतं. आरोपींच्या कुटुंबीयांना घर सोडावं लागलं होतं याची दखल घेऊ शकत नाही,” असंही कोर्टाने सांगितलं. कोर्टाने यावेळी आरोपी पॅरोल किंवा फर्लोसाठी अर्ज करु शकत नाहीत असंही कोर्टाने नमूद केलं आहे.

काय आहे प्रकरण?

मुंबईतील महालक्ष्मी येथील शक्ती मिल कंपाऊंडमध्ये २२ ऑगस्ट २०१३ ला एका महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. छायाचित्रकार असणारी महिला आपल्या सहकाऱ्यासोबत फोटाग्राफी करण्यासाठी गेली होती. यावेळी पाच जणांनी तिच्यावर बलात्कार केला होता.

हे प्रकरण समोर आल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापची लाट उसळली होती. पोलिसांनी याप्रकरणी विजय जाधव, कासीम बंगाली, सलिम अन्सारी, सिराज खान आणि एका अल्पवयीन मुलाला अटक केली होती. कोर्टाने सिराज खान याला जन्मठेपेची आणि इतर तिघांना फाशीची शिक्षा सुनावली होती. तर अल्पवयीन मुलाची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Shakti mill gangrape bombay high court cancels death sentence of three convicts sgy

Next Story
पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याचा राजीनामा
ताज्या बातम्या