मुंबई : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाच्या कामाला महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) गती दिली आहे. भूसंपादन प्रक्रियेअंतर्गत आतापर्यंत महामार्गाच्या आखणीतील १२९ गावांमधील १०० टक्के संयुक्त मोजणी पूर्ण झाली. शेतकऱ्यांच्या सहकार्यामुळे ही मोजणी पूर्ण झाली असून उर्वरित गावांतील संयुक्त मोजणीचे काम प्रगतीपथावर आहे. भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करून निविदा प्रक्रिया राबवून या प्रकल्पाच्या कामाला तातडीने सुरुवात करण्याचे एमएसआरडीसीचे नियोजन आहे.
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गामुळे नागपूर-मुंबई प्रवास अतिजलद झाला आहे. ७०१ किमीच्या या महामार्गाच्या धर्तीवर राज्यात आणखी एक मोठा महामार्ग बांधून विदर्भाला कोकणाशी जोडण्याचा निर्णय एमएसआरडीसीने घेतला. त्यानुसार नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाची आखणी करण्यात आली.
एमएसआरडीसीच्या संरेखनानुसार हा महामार्ग ८५६.७६५ किमी लांबीचा असून राज्यातील १३ जिल्ह्यांमधून हा महामार्ग जाणार आहे. वर्धा येथील पवनार येथून सुरू होऊन हा महामार्ग सिंधुदुर्ग येथील पत्रादेवी येथे येऊन संपणार आहे. या महामार्गाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या दृष्टीने सध्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. भूसंपादन प्रक्रियेअंतर्गत सध्या गावांची संयुक्त मोजणी सुरू आहे.
दरम्यान, या महामार्गाला सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर व अन्य जिल्ह्यांमध्ये तीव्र विरोध आहे. याविरोधात अनेक जिल्ह्यांमध्ये जनआंदोलनही उभारण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर मूळ संरेखनात बदल करून सुधारित संरेखन तयार करण्यात आले आहे. हे संरेखन अंतिम करण्यात आले आहे. मात्र, त्यानंतरही शक्तिपीठला विरोध कायम असून हा महामार्ग रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांची आहे. असे असताना दुसरीकडे मात्र एमएसआरडीसीकडून संयुक्त मोजणीचे काम वेगात सुरू आहे. शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांचा विश्वास संपादित करून संयुक्त मोजणी केली जात असल्याची माहिती एमएसआरडीसीतील अधिकाऱ्यांनी दिली.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार १३ जिल्ह्यांतील ४० तालुक्यांतील ४०९ गावांमध्ये संयुक्त मोजणी केली जात आहे. यातील १२९ गावांची संयुक्त मोजणी पूर्ण झाली आहे. १५ गावांमध्ये संयुक्त मोजणीची प्रक्रिया अंशत: पूर्ण झाली असून २६५ गावांमध्ये मोजणीचे काम प्रगतिपथावर आहे. शेतकऱ्यांशी संवाद सुरू आहे. संयुक्त मोजणी पूर्ण झालेल्या १२९ गावांमध्ये वर्धा जिल्ह्यातील दोन तालुक्यांतील २० गावांचा, यवतमाळ जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील ७० गावांचा समावेश आहे. तर मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात एका तालुक्यातील ११ गावांमध्ये तर हिंगोली जिल्ह्यातील तीन तालुक्यांतील ४० गावांत, परभणी जिल्ह्यातील दोन तालुक्यांतील सहा गावांत तसेच बीडमधील दोन तालुक्यांतील आठ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण झाली आहे.
लातूर जिल्ह्यातील तीन तालुक्यांतील चार गावांची संयुक्त मोजणी झाली असून आठ गावांची संयुक्त मोजणी अंशत: झाली आहे. धाराशिव जिल्ह्यातील एका तालुक्यातील आठ गावांची संयुक्त मोजणी पूर्ण झाली असून पाच गावांतील संयुक्त मोजणी अंशत: झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये संयुक्त मोजणी संदर्भात शेतकऱ्यांसोबत संवाद प्रक्रिया सुरू आहे.
