मुंबईः राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी नागपूर- गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या सुधारित आराखड्यामुळे माहूरगड,परळी वैजनाथ, तूळजाभवनी, पंढरपूरचा विठोबा, कोल्हापूरची अंबाबाई तसेच कुणकेश्वरचे शिवमंदीर आणि रेड्डीचा गणपती आदी धार्मिक स्थळे कोसो दूर पडली असून काही धार्मिक स्थळे मात्र महामार्गाच्या जवळ आली आहेत. तसेच या सुधारित मार्गामुळे प्रकल्पाच्या अंतरामध्ये आणि किंमतीतही वाढ होणार असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली.
सुमारे ८३ हजार कोटी रुपये खर्चाच्या आणि ८०२ किलोमीटर लांबीच्या पवनार(वर्धा) ते पत्रादेवी( सिंधुदुर्ग) दरम्यानच्या महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाच्या बांधणीस सरकारने फेब्रुवारी२०२४मध्ये मान्यता दिली होती. मुळ नियोजनानुसार तीन वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी राज्य रस्ते विकास महामंडळावर(एमएसआरडीसी) सोपविण्यात आली होती. त्यानुसार एमएसआरडीसीने या प्रकल्पाची आखणी करुन भूसंपादनाचीही प्रक्रिया सुरु केली होती.
मात्र कोल्हापूर जिल्हयात या प्रकल्पाविरोधात जनांदोलन उभे राहिल्यानंतर एमएसआरडीसी आणि राज्य सरकारला माघार घ्यावी लागली. राज्य सरकारने विरोध होणारा भाग वगळून प्रकल्पाची नव्याने आखणी करण्याचे आदेश एमएसआरडीसीला दिले होते. त्यानुसार महामंडळाने या प्रकल्पाची नव्याने आखणी केली असून वर्धा, यवतमाळ, बीड व लातूर या जिल्हे वगळता महामार्गाची नव्याने आखणी करण्यात आली आहे. त्यामुळे मूळ८०२ किलोमीटर लांबीच्या या मार्गाची लांबी ५४ किलोमीटरने वाढून ८५६ किलोमीटरवर पोहोचली आहे. नांदेड, हिंगोली, परभणी, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर जिव्हयात ज्या भागातून महामार्गास विरोध झाला होतो, तेथून महामार्ग अन्य भागातून नेण्यात येणार आहे. तर सातारा आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये मार्गात मोठी सुधारणा करुन नव्यानेच महामार्गाची आखणी करण्यात आली आहे.
महामार्गाच्या सुधारित आराखड्यामुळे काही प्रमुख शक्तीपीठे, धार्मिक स्थळे महामार्गापासून कोसो दूर गेली असून काही स्थळे जवळ आली आहेत. यात माहूरगडाचे अंतर (रेणुकामात) सुमारे १७ किलोमीटर, औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग १४ किलोमीटर, परळी वैद्यनाथ ११ किलोमीटर,तुळजापूर १४ किलोमीटर, पंढरपूर २५ किलोमीटर., कोल्हापूर महालक्ष्मी ८ किलोमीटर, कुणकेश्वर शिवमंदीर २५ किलोमीटर तर रेडी गणपती ३२ किलोमीटर अंतरापर्यंत दूर गेले आहेत. तर सेवाग्राम १ किलोमीटर, अंबाजोगाई ६ किलोमीटर,नरसोबाची वाडी, पन्हाळा- ज्योतिबा ही धार्मिक स्थळे६- ७ किलोमीटर, आदमापूरचा बाळूमामा १ किलोमीटर पत्रादेवी १ किलोमीटर पर्यंत महामार्गाच्या जवळ आली आहेत.
शक्तीपीठ महामार्गाच्या सुधारित आणखीमुळे महामार्गाच्या लांबीच झालेल्या वाढीमुळे प्रकल्पाचा बांधकाम खर्च ५० हजार कोटींवरुन ६६ हजार कोटींपर्यंत वाढला असून सुमारे ५०० ते ६०० हेक्टर अधिक जमीनीचे भूसंपादन करावे लागणार आहे. त्यामुळे भूसंपादन, पर्यावरण विषयक परवाद्या व अन्य कर याच्यामध्येही वाढ होऊन प्रकल्पाचा खर्च एक लाख १५ हजार कोटींच्या घरात जाण्याची शक्यता असल्याची माहितीही सूत्रांनी दिली. महामार्गाची सुधारित आणखी करताना सध्याच्या नागपूर- रत्नागिरी मार्गापासून हा मार्ग दूरुन आणि अविकसित भागातून जात असल्याने त्याच्या लांबीत वाढ झाली आहे.
शक्तीपीठ महामार्गाच्या सुधारित आखणीमुळे अविकसित भागातील विकासाला चालना मिळेल. तसेच सातारा जिल्हयाचा नव्याने समावेश करण्यात आल्याने हा भागही विकासाच्या प्रवाहात येईल . – अनिलकुमार गायकवाड, व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ
