मुंबई : विदर्भाच्या विकासाशी निगडित असलेल्या ऐतिहासिक शकुंतला रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेज रूपांतरण आणि प्रलंबित रेल्वे प्रकल्पाचे काम तातडीने सुरू करण्यात यावे, अशी जोरदार मागणी आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी विधान परिषदेत लक्षवेधी सूचना क्रमांक ७२७ अंतर्गत केली. यावेळी शासनाकडून देण्यात आलेल्या उत्तरावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. हे उत्तर २०२४ मध्ये विधानसभेत त्यांच्या लक्षवेधी वर जसाच्या तसे २०२६ च्या पावसाळी अधिवेशनात देण्यात आले आहे. असा आरोप त्यांनी केला.
बच्चू कडू यांनी सांगितले की, अमरावती जिल्ह्यातील अचलपूर ते यवतमाळ या मार्गावर धावणारी शकुंतला रेल्वे सेवा स्वातंत्र्यपूर्व काळापासून विदर्भातील जनतेची जीवनवाहिनी राहिली आहे. ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे कंपनीने डिसेंबर १९१३ मध्ये सुरू केलेल्या या रेल्वे सेवेला आता ११३ वर्षांचा इतिहास लाभला आहे. नॅरोगेज मार्गावर धावणाऱ्या या रेल्वेच्या वेगमर्यादा आणि तांत्रिक अडचणींमुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत होते.
२०१० पासून या मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यासाठी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. माजी खासदार भावना गवळी यांनी अनेक वेळा पाठपुरावा केला आहे. सध्या शकुंतला रेल्वे सेवा बंद असून अचलपूर–मूर्तिजापूर या ७६.५ किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गाला मंजुरी मिळाल्यानंतरही प्रत्यक्ष काम सुरू झालेले नाही. त्यामुळे नागरिकांच्या दळणवळण सुविधांवर परिणाम होत असून विदर्भाच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासालाही फटका बसत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी शासनाने दिलेले उत्तर हे २०२४ मध्ये विधानसभेत देण्यात आलेल्या उत्तराची अक्षरशः पुनरावृत्ती असल्याचा आरोप करत बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली. “दोन वर्षांनंतरही प्रकल्पाबाबत कोणतीही ठोस प्रगती दिसत नाही,” असे ते म्हणाले.
यावर उत्तर देताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रेल्वे हा केंद्र सरकारच्या अखत्यारीतील विषय असल्याचे स्पष्ट केले. मात्र महाराष्ट्र सरकार या प्रकल्पासाठी आवश्यक असलेला ५० टक्के आर्थिक हिस्सा उचलण्यास पूर्णपणे तयार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रकल्पाचा अंदाजित अतिरिक्त खर्च वाढून सुमारे तीन हजार कोटी वर पोहचला आहे. त्यात अगोदर पेक्षा १,२०० कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. राज्य सरकार सहकार्य करण्यास तयार असून हा महत्त्वाचा रेल्वे मार्ग लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन सरनाईक यांनी दिले.
