मुंबई : प्रत्येक पिढीतील वाचक वेगळे असतात. त्या त्या काळानुसार आणि जाणिवांनुसार ‘क्लासिक’ असणाऱ्या साहित्याचा अनुवाद पुन्हा पुन्हा व्हायला हवा. क्लासिकल साहित्य हे कालातीत असते म्हणूनच ते क्लासिकल असते, असे मत ज्येष्ठ लेखिका आणि अनुवादक शांता गोखले यांनी रविवारी व्यक्त केले.
‘एखाद्या भाषेतून दुसऱ्या भाषेत अनुवाद करताना भाषेसोबतच अनुवादकाराला सांस्कृतिक संदर्भाचे ज्ञान असणे गरजेचे आहे. कारण तुम्ही त्यातील आशय हा दुसऱ्या भाषेतील वाचकांपर्यंत पोहोचवत असता. त्यासाठी अशा एखाद्या शब्दाचा किंवा वाक्-प्रचाराचा अर्थ पोहोचविण्यासाठी तुम्हाला त्या संदर्भाचा विस्तार करावा लागतो.’ असेही त्या म्हणाल्या.
मुंबईत शनिवारपासून प्रसिद्ध काळा घोडा कला महोत्सवाला सुरुवात झाली आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. रविवारी साहित्य विभागात ज्येष्ठ लेखिका शांता गोखले आणि पत्रकार लेखक जेरी पिंटो यांच्या ‘टू रायटर्स, मेनी लँग्वेजेस’ या कार्यक्रमाचे आयोजन दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध डेव्हिड ससून ग्रंथालय येथे करण्यात आले होते. यावेळी शांता गोखले आणि जेरी पिंटो यांनी विविध भाषांमध्ये साहित्य प्रसार करतानाचे अनुभव प्रेक्षकांसमोर मांडले. तसेच अनुवादाच्या विविध पैलूंवर चर्चा करतानाच साहित्य व्यवहारात कोणते नवे बदल झाले आहेत यावरही त्यांनी प्रकाश टाकला.
भाषांतराचे जग उलगडताना शांता गोखले यांनी प्रसिद्ध अमेरिकन लेखिका सुझान सॉन्टाग यांच्या वाक्याचा दाखला दिला, ‘आपण तीच पुस्तके भाषांतरीत करतो जी पुस्तके काळाच्या कसोटीवर उतरतात. ती पुस्तके केवळ उत्तम नसतात तर ती पुन्हा पुन्हा वाचण्यासारखी असतात. म्हणूनच ती पुन्हा पुन्हा भाषांतरित होतात.’
पुढे त्या म्हणाल्या की, एखादे साहित्य ‘क्लासिकल’ असण्याचा अर्थ हाच आहे की, ते साहित्य फक्त एका काळापुरता नसते तर ते पुढील अनेक पिढ्यांसाठी महत्वाचे असते. आणि ते नव्या पिढीपर्यत पोहोचण्यासाठी प्रत्येक पिढीतील अनुवादकाला अशा साहित्याचा अनुवाद पुन्हा पुन्हा करावा लागतो. कारण अनुवादक हा त्याच्या पिढीच्या जाणिवांनुसार आणि काळानुसार अनुवाद करत असतो. यावेळी शांता गोखले यांनी लेखिका किरण देसाई यांच्या ‘हॅट घालणारी बाई’ या पुस्तकाचा अनुवाद करतानाच प्रवासही मांडला. तसेच त्या पुस्तकातील एक उताऱ्याचे वाचनही त्यांनी यावेळी केले.
प्रत्येक भाषेला स्वतःची लय आणि ताल आणि संगीत असते. ते संगीत अगदी जसेच्या तसेच उतरवता येत नाही. तसा प्रयत्न केला तर ते बनावट वाटू शकते मात्र, भाषांतर करणाऱ्या व्यक्तीला मूळ भाषेसारखी लय आणि प्रवाह निर्माण करता येऊ शकतो. ते जमलं की भाषनंतर जिवंत वाटते. असे भाषांतराविषयी बोलताना लेखक आणि अनुवादक जेरी पिंटो यांनी सांगितले. यावेळी तरुण वाचक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. परदेशी साहित्यप्रेमींचाही प्रतिसाद होता.

