मुंबई : एक हजार वाचकांनी खचाखच भरलेले नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (एनसीपीए) येथील जमशेद भाभा थियटर आणि समोर मंचावर सुरू असणारे सुंदर सिंफनी वादन. अशा वातावरणात एकीकडे वाचक विविध साहित्याच्या वाचनात दंग झालेले, तर दुसरीकडे सिंफनी वादनालाही दाद दिली जात होती. साहित्य आणि संगीत या दोन कलांच्या या आगळ्या वेगळ्या प्रयोगाचा आनंद रविवारी मुंबईकर वाचकांना घेता आला.

‘मुंबई बुकीज’ या वाचकांसाठी सुरू करण्यात आलेल्या संस्थेकडून या अनोख्या कार्यक्रमाचे रविवारी एनसीपीए येथील जमशेद भाभा थियटरमध्ये आयोजन करण्यात आले होते. शंतनू नायडू आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून ‘मुंबई बुकीज’ ही संस्था चालवली जाते. यात दर रविवारी ठरलेल्या जागी पुस्तक वाचनासाठी शेकडो युवक एकत्र येतात. याच उपक्रमाचा भाग म्हणून एनसीपीए आणि सिम्फनी ऑर्केस्ट्रा ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने हा आगळावेगळा प्रयोग करण्यात आला. कलाकारांच्या तालमीत कोणतीही बाधा न येऊ देता हा उपक्रम राबविण्यात आला, असे शंतनू यांनी सांगतिले. याप्रसंगी ६० हून अधिक कलाकार आपल्या तालमीत दंग होते. मंचावरून बीथोव्हेन, मेंडेलसोन आणि त्चैकोव्स्की या जगप्रसिद्ध संगीतकारांच्या धून वाजवल्या जात असतानाच विविध प्रकारचे साहित्याचा आनंद वाचक घेत होते. यात प्रामुख्याने तरुण वाचकांसह सर्व वयोगटातील वाचक सहभागी झाले होते. मुंबईत अशा प्रकारचा भव्य कार्यक्रम प्रथमच आयोजित करण्यात होता असे संस्थेकडून सांगण्यात आले.

‘मुंबई बुकीज’तर्फे आतापर्यंत मुंबईतील विविध स्थळांवर वाचनाचे उपक्रम राबविण्यात आले आहेत. यात एशियाटिक ग्रंथालय, डेव्हिड ससून ग्रंथालय, एनसीपीए, तसेच विविध उद्यानांसह काही जागांचा समावेश आहे. यात सहभागी होणारे वाचकांनी आपल्या सोबत पुस्तक घेऊन येणे अपेक्षित असते. वाचनसत्र पार पडल्यानंतर संबंधित पुस्तकांवर एकमेकांशी चर्चा करतात. नागरिकांमध्ये वाचनाची आवड पुन्हा निर्माण करणे तसेच गजबजलेल्या शहरात वाचनासाठी एक शांत जागा आणि वेळ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमामागील उद्देश आहे. यासाठी कोणतेही शुल्क घेतले जात नाही. मुंबई शहरातील आणि उपनगरातील वाचनाची आवड असणारे अनेकजण नियमितपणे या उपक्रमात सहभागी होतात.

साहित्य आणि शास्त्रीय संगीत अशा दोन कलांना एकत्र आणून वाचकांना एक वेगळा अनुभव देणे हा या उपक्रमामागील उद्देश होता. आम्ही या उपक्रमात सहभागी होणाऱ्या वाचकांना याविषयी काहीही कल्पना दिली नव्हती. त्यामुळे त्यांच्यासाठी हा अनुभव विशेष ठरला. अर्थात सुरुवातीला संगीताचा आनंद घेत असताना त्यांना वाचनावर लक्ष केंद्रित करता आले नाही. मात्र काही वेळाने वाचक दोन्ही कलाप्रकारात रमले.- शंतनू नायडू, संस्थापक, मुंबई बुकीज