अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात आपत्कालीन व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्षपद तर नरेंद्र मोदी सरकारच्या काळात पद्यविभूषण हा दुसरा सर्वोच्च पुरस्कार, शरद पवार यांना भाजप सरकारने दिलेली ही दुसरी भेट आहे!

वाजपेयी सरकारने कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा असलेल्या आपत्कालीन व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्षपद शरद पवारांकडे सोपविले होते. भूजच्या भूकंपानंतर आपत्कालीन व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याकरिता लातूर भूकंपानंतर पुनर्वसनाचे काम यशस्वीपणे केलेल्या पवारांकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली होती. पवारांच्या अहवालावरूनच कोणत्याही नैसर्गिक आपत्तीनंतर मदतीला धावून येणारे राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाची (एन.डी.आर.एफ.) स्थापना करण्यात आली होती.

मोदी आणि पवारांमधील उत्तम संबंधांबाबत नेहमीच चर्चा होते. बारामती किंवा पुण्यातील मेळाव्यात मोदी यांनी पवारांचे तोंडभरून कौतुक करताना त्यांची नेहमीच मदत झाल्याचे मान्य केले होते. पवारांनीही मोदी यांच्यावर स्तुतिसुमने उधळली होती. मोदी आणि पवारांच्या संबंधावरून काँग्रेसचे नेते नेहमीच नाके मुरडतात. महाराष्ट्रातील महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी आघाडीची चर्चा सुरू असतानाच केंद्रातील भाजप सरकारने पवारांना देशातील दुसरा सर्वोच्च पुरस्कार देऊन गौरविले आहे. हा शरद पवार यांच्या कार्याचा गौरव आहे. देशात पवार आणि करुणानिधी हे दोनच नेते सातत्याने ५० वर्षे निवडणुकांमध्ये निवडून आलेले आहेत. लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधान परिषद अशा चारही सभागृहांमध्ये पवारांनी प्रतिनिधित्व केले आहे. उगाचच भाजपशी संबंध जोडून त्याला वेगळा रंग देणे चुकीचे ठरेल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केली. पवारांना पद्यविभूषण हा पुरस्कार जाहीर झाल्यानिमित्त राष्ट्रवादीच्या मुख्यालयात फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला.