मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे मंगळवारी ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असली तरी त्यांच्या तातडीने विविध तपासण्या करण्यात आल्या. या तपासण्याचा अहवाल आल्यानंतरच पुढील उपचाराबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
शरद पवार यांना नियमित तपासणी आणि काही वैद्यकीय चाचण्यांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या विविध चाचण्या करण्यात आल्या असून, अहवाल आल्यानंतरच त्यांच्या प्रकृतीबाबत स्पष्टपणे कळेल, अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी माध्यमांना दिली.
दरम्यान, शरद पवार यांना मागील महिन्यातही प्रकृती अस्वास्थ्यामुळे पुण्यातील रुग्णालयात दाखल केले होते. काही दिवस उपचार केल्यानंतर त्यांना घरी पाठविण्यात आले होते. मात्र, पुन्हा एकदा मंगळवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच शरद पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने त्यांचा बारामती दौराही रद्द करण्यात आला आहे.
शरद पवार यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्यांच्या वयाचा आणि अलीकडील प्रकृतीचा विचार करून केवळ खबरदारी म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचेही सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
