भाषणाआधी फुले, शाहू, आंबेडकर यांची नावं का घेता? चिट्ठीचा किस्सा सांगत शरद पवार म्हणाले…

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना भाषणापूर्वी फुले, शाहू, आंबेडकर अशी नावं का घेता म्हणून चिट्ठी आल्याचा एक किस्सा सांगितला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांना भाषणापूर्वी फुले, शाहू, आंबेडकर अशी नावं का घेता म्हणून चिट्ठी आल्याचा एक किस्सा सांगितला. तसेच महात्मा फुले यांनी इंग्लंडच्या राजाकडे केलेल्या ३ मागण्या आणि गेट वे ऑफ इंडियाची ऐतिहासिक घटनेविषयी माहिती सांगितली. ते यशवंतराव चव्हाण स्मृतीदिना निमित्त देण्यात आलेल्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलत होते. यावेळी सीरम इस्टिट्युटला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं.

शरद पवार म्हणाले, “माझ्या भाषणाआधी मला कुणीतरी चिट्ठी पाठवली की तुम्ही तुमच्या भाषणाआधी कायम फुले, शाहू, आंबेडकर अशी नावं घेतात. ही व्यक्तीपुजा का? मी त्यांना उत्तर देताना सांगितलं की यात व्यक्तीपूजेचा कोणताही संबंध नाही. महात्मा फुले यांच्याकडे बघण्याचा आमचा दृष्टीकोनच वेगळा आहे. महात्म फुले किंवा सावित्रीबाई फुले म्हटलं की आपल्या मनात स्त्री शिक्षण किंवा शिक्षणाचं सार्वत्रिकरण डोळ्यासमोर येतं. मला यापेक्षाही त्यांचा दुसरा दृष्टीकोन अधिक भावतो.”

महात्मा फुले आणि इंग्लंडच्या राजाची गेट वे ऑफ इंडिया येथे भेट

“इंग्लंडचा राजा भारतात येणार होता. त्याची बोट मुंबईला लागणार होती. गेट वे ऑफ इंडिया त्याच्या स्वागतासाठी तयार करण्यात आलं होतं. तिथं इंग्लंडच्या राजाची बोट येणार होती आणि मग स्वागत केलं जाणार होतं. त्यावेळी गेट वे ऑफ इंडियाच्या बाजूला अनेक गोरे अधिकारी थांबलेले होते. तिथंच कोपऱ्यात डोक्याला मुंडासे बांधलेला, धोतर-कुर्ता घातलेला शेतकऱ्यासारखा व्यक्ती थांबलेला होता,” असं शरद पवार म्हणाले.

महात्मा फुलेंकडून इंग्लंडच्या राजाला निवेदन

“त्या व्यक्तीच्या हातात निवेदनाचा कागद होता. राजा उतरला, पोलिसांनी सर्वांना बाजूला केलं. त्या फेटेवाल्यालाही बाजूला केलं, पण त्या राजाची नजर त्या व्यक्तीवर गेली. राजाने आपल्या अंगरक्षकाला विचारलं त्या व्यक्तीच्या हातात कागद दिसतो आहे. त्यांना काही निवेदन द्यायचं आहे का? त्यांना बोलवा. यानंतर त्या व्यक्तीने इंग्लंडच्या राजाला निवेदन दिलं. ही व्यक्ती म्हणजे जोतिबा फुले,” असंही पवारांनी नमूद केलं.

“खडी फोडण्याऐवजी फुलेंकडून जलसंधारणाच्या प्रकल्पाची मागणी”

शरद पवार म्हणाले, “या निवेदनात लिहिलं होतं पिढ्यानपिढ्या आमच्या राज्यात दुष्काळ पडतो. त्या काळात रोजगार म्हणून खडी फोडण्याचं काम दिलं जातं. आता खडी फोडण्याची शिक्षा बंद करा आणि परिसरात पडणारा थेंब आणि थेंब साठवून भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवण्याचा प्रकल्प हाती घ्या. त्यासाठी आम्ही कष्ट करायला तयार आहोत.”

“फुलेंनी ज्वारीच्या संकरासाठी विलायतेतून दुसऱ्या वाणाची मागणी केली”

“महात्मा फुलेंची दुसरी मागणी होती पिढ्यानपिढ्या आमच्याकडे ज्वारीचं पिक घेतलं जातं. त्यातीलच काही ज्वारी पुढच्या वेळी बी म्हणून वापरली जाते. त्यामुळे तेच बी आम्ही पुन्हा पुन्हा वापरतो आणि त्यामुळे बियाची प्रतवारी कमी होते. म्हणून आज याचा वाण सुधारला पाहिजे. त्यासाठी विलायतेतून दुसरा वाण आणून संकर करून नवीन संकरीत जात तयार केली पाहिजे. त्यांच्या या मागणीत वैज्ञानिक दृष्टीकोन होता,” असं शरद पवार यांनी सांगितलं.

हेही वाचा : “एसटीची अशी अवस्था कधीही झाली नव्हती”, कर्मचारी संपावरून शरद पवारांची प्रतिक्रिया!

“त्यांनी तिसरा मुद्दा मांडला, आमच्याकडे शेतकऱ्याला जोडधंद्याची गरज आहे. तो जोडधंदा फक्त दुधाचा आहे, पण आमच्याकडील गायींचं दुध कमी होत आहे. त्याचं कारण समरक्ताचा संगम गायींमध्ये होतो. त्यामुळे पुढील पिढीत समरक्त आहे. त्यामुळे पाहिजे तशी प्रतवारी तयार होत नाही. ही प्रतवारी आणि दुधाचं उत्पादन वाढवायचं असेल तर विलायतेतून वळू पाठवा आणि संकर करून नवीन वाण तयार करा. हा वैज्ञानिक दृष्टीकोन महात्मा फुले यांच्याकडे होता,” असंही शरद पवार यांनी नमूद केलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sharad pawar answer why he mention shahu phule ambedkar before his speech pbs

ताज्या बातम्या