राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी समाजातील जातीभेद आणि अस्पृश्यतेवर भाष्य करत एका महत्त्वाच्या घटनेचा उल्लेख केला. तसेच हे सांगताना खरा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता कोण याचाही मोठा संदेश दिला. आपल्या समाजातील उपेक्षित घटकांवर अनेक अत्याचार आणि अन्याय होतात. त्यामुळे त्याबद्दल या तरुणांमध्ये मनात अस्वस्थता असते, असंही निरिक्षण पवारांनी व्यक्त केलं. ते त्यांच्या जन्मदिनानिमित्त मुंबईत आयोजित सभेत बोलत होते.

शरद पवार म्हणाले, “मोतीलाल राठोड या कवीने आपल्या पाथरवट कवितेत सांगितलं की, हा मोठा दगड आम्ही घेतला, आमच्या घामाने, कष्टाने, हातातील छन्नीने आणि हातोड्याने त्या दगडाचे मूर्तीत रुपांतर करतो. यानंतर सगळं गाव आलं आणि वाजत गाजत ती मूर्ती मंदिरात प्रतिष्ठापित केली. त्यापूर्वी माझ्याकडं कुणी ढुंकूनही पाहत नव्हतं.”

“तुमची समाज व्यवस्था आम्हाला उद्ध्वस्त करायची आहे”

“माझ्या घामाने मूर्ती तयार झाल्यानंतर मी दलित आहे म्हणून मला मंदिरात प्रवेश नाही. ही मूर्ती तुमच्या बापजाद्यांचं प्रतिक आहे, पण तिचा बापजादा मी आहे. असं असताना त्या मंदिरात तुम्ही मला येऊ देखील देत नाहीत. ही तुमची समाज व्यवस्था आम्हाला उद्ध्वस्त करायची आहे,” असं शरद पवारांनी सांगितलं.

“…तोच खरा राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता”

शरद पवार पुढे म्हणाले, “अशी एखादी कविता ऐकली की रात्री झोप येऊ शकत नाही. आपण स्वतः गुन्हेगार आहोत असं वाटतं. आपण काही केलं असो अथवा नसो, पण आपण त्या समाजाचे प्रतिनिधी आहोत. या समाजातील उपेक्षित वर्गावर जे अत्याचार अन्याय केले त्याची अस्वस्थता त्यांच्या मनात आहे. ती दूर करण्यासाठी खऱ्या अर्थाने प्रयत्नांची परिकाष्टा करण्याची गरज आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता हे सर्व ऐकल्यावर अस्वस्थ झाला तर तो खरा कार्यकर्ता आहे.”

हेही वाचा : साहित्य संमेलनातील शाई फेकीच्या घटनेवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

“मी अनेकदा संध्याकाळी गरीब समाजातून आलेल्या तरुणांसोबत घालवली आहे. त्याच्या मनात किती अस्वस्थता आहे, अन्याय-अत्याचाराबाबत ते काय विचार करतात हे यामुळे ऐकायला मिळते. आपण समाजकारण करणार असू तर त्यांच्या यातना दूर करण्यासाठी राजकीय पक्ष म्हणून आपण काय करणार आहोत याचा विचार या निमित्ताने होतो,” असंही पवारांनी यावेळी नमूद केलं.