डॉ. अरुण टिकेकर यांच्या रुपाने महाराष्ट्राला एक सव्यसाची आणि विचारवंत संपादक मिळाले होते, अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी व्यक्त केली.
टिकेकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून ते म्हणाले, ‘लोकसत्ता’ या महत्त्वाच्या वर्तमानपत्राचे संपादक म्हणून त्यांनी केलेले कार्य वाचकांची वैचारिक बैठक तयार करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे ठरले. जगभरात कीर्ती असलेल्या एशियाटिक सोसायटीचे त्यांनी प्रदीर्घ काळ प्रमुखपद सांभाळले होते. एशियाटिकचा विस्तार व त्याचबरोबर असंख्य मान्यवर ज्यामध्ये थोर लेखिका दुर्गाबाई भागवत यांचाही सहभाग होता, या सगळ्यांशी अत्यंत चांगला संवाद त्यांनी लोक मानसात रुजवला होता. मुंबई विद्यापीठ ही अशीच त्यांची एक आपुलकीने काम करण्याची जागा. मुंबई विद्यापीठाचा इतिहास लिहिण्याचे मोठे कार्य त्यांच्या हातून झाले.
‘फास्ट फॉरवर्ड’ या माझ्या संग्रहाच्या निमित्ताने त्यांच्याबरोबर अनेक वेळा सामाजिक, राजकीय, राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर आमची चर्चा व्हायची. मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांवर प्रभाव असलेल्या डॉ. टिकेकर यांनी अनेक ग्रंथाचे लिखाण केले. महाराष्ट्राच्या वैचारिक परंपरेतील आपले स्थान त्यांनी परिश्रमपूर्वक मिळवले होते. त्यांनी केलेल्या कार्याची जाणीव पुढील पिढ्यांपर्यंत राहील, असेही त्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.