Sharad Pawar Post After Rajya Sabha Nomination: पुन्हा एकदा राज्यसभेसाठी अर्ज सादर केल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत भावना व्यक्त केल्या आहेत. पुन्हा सहा वर्षांसाठी मिळालेल्या संधीबद्दल त्यांनी महाराष्ट्रातील जनता आणि मित्रपक्षांचे आभार मानले आहेत. महाराष्ट्राने दिलेले प्रेम, विश्वास आणि पाठबळ हेच उर्जेचे खरे स्त्रोत असल्याचे पवारांनी म्हटले आहे. “महाराष्ट्रासाठी विकासासाठी आणि प्रगतीसाठी आयुष्यभर काम करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो”, असे पवारांनी पोस्टमध्ये नमूद केले आहे.
शरद पवार पोस्टमध्ये काय म्हणाले?
१९६७ पासून लोकप्रतिनिधी म्हणून सुरु झालेला प्रदीर्घ प्रवास माझा नव्हे तर महाराष्ट्राच्या जनतेचा असल्याचे पवारांनी पोस्टमध्ये नमूद कले आहे. जनतेचा विश्वास आणि पाठिंबा यामुळेचे संसदीय प्रवास कधीही खंड न पडता सुरु ठेवणे शक्य झल्याचे त्यांनी म्हटले आहे. शरद पवारांनी राज्यात भूषविलेल्या विविध मंत्रीपदाची माहिती देखील पोस्टमध्ये दिली आहे. लोकांच्या विश्वासाच्या बळावर राज्यात मंत्री मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेता म्हणून जबाबदारी पार पाडण्याची संधी मिळाली, असे पवारांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
मित्रपक्षांचे आभार
शरद पवारांनी केंद्रात देखील संरक्षणमंत्री, दहा वर्षे कृषीमंत्री काम करण्याची जबाबदारी मिळाल्याचे सांगत, यामागे जनतेचा विश्वास हेच सर्वात मोठे बळ राहिल्याचे नमूद केले. “महाराष्ट्रातील जनतेने पुन्हा एकदा पुढील सहा वर्षे सेवा करण्याची संधी देऊन माझ्यावर मोठा विश्वास दाखवला आहे. या विश्वासाबद्दल मी महाराष्ट्राच्या जनतेचा तसेच माझ्या सर्व मित्रपक्षांचा मनापासून ऋणी आहे,” अशा शब्दात त्यांनी जनता आणि मित्र पक्षाचे आभार मानले.
हे मी माझे भाग्य समजतो – शरद पवार
“महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी काम करण्याची संधी आयुष्यभर मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो. पुढील काळातही जनतेच्या अपेक्षांना न्याय देत ही सेवा प्रामाणिकपणे करत राहण्याचा माझा प्रयत्न असेल”, अशा शब्दात शरद पवारांनी भावना व्यक्त केल्या. सध्या डॉक्टरांनी विश्रांती घेण्याचा सल्ला दिल्याचे पवारांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
महाराष्ट्रातून सात खासदार
महाराष्ट्रातून सात खासदार राज्यसभेवर जाणार आहेत. सात जागांपैकी सहा जागा महायुतीकडे होत्या तर महाविकास आघाडीकडे केवळ एक जागा होती. मविआच्या एका जागेवर शरद पवार यांचे नाव निश्चित करण्यात आले. तर, भाजापाकडून विनोद तावडे, रामदास आठवले, रामराव वडकुते, माया इवानाते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून ज्योती वाघमारे तर, अजित पवारांच्या राष्ट्रावादीने पार्थ पवारांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सात जागांसाठी सात अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
