नवी मुंबई महानगरपालिकेत गणेश नाईक यांनी कुटुंबातील किंवा अन्य नातेवाईकांना उमेदवारी देण्याचे टाळले आणि त्याचा पक्षाला फायदाही झाला. पक्षाच्या अन्य नेत्यांनी याचा बोध घ्यावा, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी घराणेशाहीवरून नेतेमंडळींना कानपिचक्या दिल्या.
अन्य पक्षांप्रमाणेच राष्ट्रवादीतही मोठय़ा प्रमाणात घराणेशाही आहे. उमेदवारी देताना नेत्यांकडून मुले किंवा नातेवाईकांसाठी आग्रह धरला जातो. या पाश्र्वभूमीवर पवार यांनी नाईकांचा आदर्श घ्यावा हा दिलेला सल्ला बराच बोलका आहे. वास्तविक मुलगा महापौर आणि खासदार, दुसरा मुलगा आमदार, पुतण्या महापौर असे प्रयोग करीत गणेश नाईक यांनी सारी पदे घरात राहतील, असा प्रयत्न पूर्वी केला. मात्र पालिका निवडणुकीत यश मिळविण्यासाठी गणेश नाईक यांनी घराणेशाहीचा आरोप होणार नाही याची खबरदारी घेतली. एखादा अपवाद वगळता घरातील कोणालाही उमेदवारी दिली नाही. यामुळे विरोधकांना यंदा त्यांच्यावर घराणेशाहीचा आरोप करण्याची संधी मिळाली नाही. नवी मुंबईतील यशाबद्दल राष्ट्रवादीच्या बैठकीत गणेश नाईक यांचा सत्कार करण्यात आला तसेच व्यासपीठावर पहिल्या रांगेत बसण्याची संधी देण्यात आली. नाईक यांच्याप्रमाणेच तासगावमधून विजयी झालेल्या दिवंगत आर. आर. पाटील यांच्या पत्नी सुमनताई पाटील यांचा सत्कार करण्यात आला. अनेक महिन्यांनंतर राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर नाईक उपस्थित होते. शरद पवार यांनी नवी मुंबईतील यशाचे श्रेय नाईक यांना दिले.

गणेश नाईक यांचा आदर्श घेण्याचे आवाहन
नातेवाईकांना उमेदवारी देण्याचे टाळणारा नवी मुंबईचा प्रयोग अन्यत्रही पक्षात व्हावा, अशी अपेक्षा शरद पवार यांनी व्यक्त केली. पण ही अपेक्षा प्रत्यक्षात येणे कठीण आहे. ही अपेक्षा व्यक्त करणारे पवार यांचीच कन्या आणि पुतण्या खासदार-आमदार आहेत. छगन भुजबळ, डॉ. पद्मसिंह पाटील, विजयसिंह मोहिते-पाटील, सुनील तटकरे, मधुकरराव पिचड, गणेश नाईक, वसंत डावखरे आदी पहिल्या फळीतील नेतेमंडळींची मुले विधिमंडळात निवडून आली आहेत. पवार यांनी घराणेशाहीवरून कानपिचक्या दिल्या असल्या तरी हा प्रयोग करणे पक्षासाठी तेवढे सोपे नाही.