मुंबई : काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए)अस्तित्वाबद्दल ममता बॅनर्जी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले असले तरी भाजपच्या विरोधात लढण्यासाठी कोणालाही वगळण्याचा प्रश्नच नाही, अशी भूमिका मांडून राष्ट्रवादी

काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसबद्दल काहीसा सावध पवित्रा घेतला.

ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसला लक्ष्य केले असताना पवारांनी ममतादीदींबरोबरच पत्रकारांशी संवाद साधताना काँग्रेसला बरोबर घेण्याची भूमिका मांडली. भाजपच्या विरोधात सामूहिक नेतृत्वाखाली लढा देण्याची आवश्यकता व्यक्त करीत पवारांनीही राहुल गांधी यांचे नेतृत्व मान्य नसल्याचा संदेश अधोरेखित केला.

काँग्रेसला वगळून नवी आघाडी आकारास येणार का, या प्रश्नावर पवारांनी तशी काही योजना नसल्याचे स्पष्ट केले. समविचारी पक्षांनी एकत्र येऊन लढल्यास मतांचे विभाजन टळेल, असेही ते म्हणाले.

कोणी नेतृत्व करायचे, हा प्रश्नच नाही. भाजपच्या विरोधात एकत्र येणे हे महत्त्वाचे आहे. नेतृत्वाचा मुद्दा हा दुय्यम असल्याचे पवार यांनी सांगितले.

देशातील सद्य:स्थिती आणि राजकीय परिस्थितीबाबत बॅनर्जी यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली.

‘भाजपाविरोधातील लढाई एकजुटीने लढण्याची गरज’

मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बुधवारी झालेली भेट आणि देशपातळीवर भाजपला नवा पर्याय निर्माण करण्याचे दोन्ही नेत्यांनी केलेले सूतोवाच, त्याचा काँग्रेसला झटका बसला आहे. भाजपविरोधातील लढाई अहंकाराने नव्हे तर, एकजुटीने लढण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली. काँग्रेस नेतृत्वाला कुणाच्या प्रशस्तिपत्राची गरज नाही, अशा शब्दात  काँग्रेस नेते व राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी ममता बॅनर्जी यांच्या वक्त्यव्यावर टीका केली.