मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी कायम राहावी यासाठी शिवसेना ठाकरे गट आग्रही आहे. शिवसेना(ठाकरे) आणि मनसे एकत्र महापालिका निवडणुकांना सामोरे जाणार असताना या आघाडीत आता राष्ट्रवादीनेही (शरद पवार) सामील व्हावे यासाठी शिवसेना (ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत आघाडीचा प्रस्ताव देण्यात आला असून काँग्रेसने आघाडीत सामील व्हावे यासाठी स्वत: शरद पवार काँग्रेस नेत्यांशी चर्चा करणार आहेत.

मुंबईसह पाच महापालिकांत शिवसेना(ठाकरे)-मनसे एकत्र निवडणूक लढवत आहेत. लोकसभा आणि विधानसभेचा निकाल पाहता शिवसेनेसाठी (ठाकरे) मुस्लिम मतेही तितकीच महत्त्वाची आहेत. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही आघाडी कायम ठेवून महापालिका निवडणुकीला सामोरे जावे यासाठी शिवसेनेकडून (ठाकरे) प्रयत्न सुरू आहेत. यासाठी प्रस्ताव घेऊन संजय राऊत यांनी शरद पवार यांची सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट घेतली. या भेटीदरम्यान महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीनेही शिवसेना-मनसेसोबत आघाडीत सामील होण्याबाबतचा प्रस्ताव शरद पवार यांच्यासमोर ठेवला.

यावेळी शरद पवार यांच्याकडून शिवसेना (ठाकरे) आणि मनसेने आपले जागावाटप निश्चि करावे, त्याचप्रमाणे राष्ट्रवादीलाही सन्मानपूर्वक जागा सोडाव्यात अशा सूचना शरद पवार यांच्याकडून करण्यात आल्याचे समजते. याबाबत संजय राऊत यांच्याकडून काँग्रेसने आघाडीमध्ये सामील होण्याबाबतही आग्रही भूमिका घेण्यात आली. शरद पवार यांनी याबाबत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करावी असे राऊत यांच्याकडून सुचविण्यात आले.

दरम्यान याआधी काँग्रेसकडूनही शरद पवार यांना आपल्यासोबत आघाडी करण्याचा प्रस्ताव देण्यात आला. समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गळ काँग्रेसकडून घालण्यात आली आहे. दुसरीकडे मनसेला सोबत घेण्यास काँग्रेसने असमर्थता दर्शविली आहे. त्यामुळे येत्या काळात शरद पवार हे कोणता निर्णय घेतात यावरच महाविकास आघाडीचे भवितव्य अवलंबून आहे.

एकनाथ शिंदेंचे निवडणुकीसाठी १० हजार कोटींचे बजेट – संजय राऊत

राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नाही, मात्र निवडणुकीसाठी सरकारकडे कोट्यवधी रुपये आहेत. आताही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार निवडणुकांसाठी हजारो कोटी उधळत आहेत. आपल्या माहितीनुसार शिंदे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी १० हजार कोटींची तरतूद केली असून प्रत्येक उमेदवाराला १० कोटी दिजे जाणार असल्याची पक्की माहिती आहे. याआधी नगरसेवक फोडण्यासाठी प्रत्येकी ५ कोटी रुपये शिंदे यांच्याकडून देण्यात आल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला.