राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी समाजातील अंधश्रद्धा आणि आधुनिकता यावर बोलताना छत्रपती शाहू महाराज यांच्याबाबतचा कोल्हापुरातील ज्योतिषाचा एक भन्नाट किस्सा सांगितला. यात कर्नाटकातील ज्योतिषी जो स्वतःला पुढचं सर्व काही कळतं तो शाहू महाराजांसमोर कसा रडला याची माहिती दिली. तसेच आपण शाहू, फुले, आंबेडकर ही नावं का घेतो याचंही कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सांगितलं. ते त्यांच्या जन्मदिनानिमित्त मुंबईत आयोजित सभेत बोलत होते.
शरद पवार म्हणाले, “शाहू महाराजांची कोल्हापूरला राजवाड्याच्या शेजारी काही शेती होती. ते तिथं जाऊन राहायचे. त्यांना शेतकऱ्यांसोबत राहायला, जेवायला आनंद वाटायचा. एक दिवस त्यांच्याकडे कोल्हापूरचे सरदार लोक आले. त्यांनी महाराजांना कर्नाटकातील खूप पुढचं ज्ञान असलेला ज्योतिषी येत असल्याचं सांगितलं. तसेच भेटण्याचा आग्रह केला. महाराजांनी माझा त्याच्यावर विश्वास नाही असं उत्तर दिलं. मी असल्या लोकांना भेटत नसतो असं स्पष्ट केलं.”
“…आणि ज्योतिषी महाराजांपुढे उभा राहून रडायला लागला”
“सरदारांनी भेटलंच पाहिजे असं म्हणत सर्वांनी खूप आग्रह केला. शेवटी महाराजांनी दोन दिवसांनी भेटायची वेळ दिली. तो ज्योतिषी २ दिवसांऐवजी ३ दिवसांनी आला. तो महाराजांपुढे उभा राहिल्यावर रडायला लागला. महाराजांनी रडायला काय झालं विचारलं. ते म्हणाले मी आलो, तुमच्या सैनिकांनी मला पकडलं, तुरुंगामध्ये टाकलं, रात्री मारमार मारलं, दोनवेळचं अन्न देखील दिलं नाही. माझे फार हाल केले,” असं शरद पवारांनी सांगितलं.
“अशा भंपक गोष्टींवर माझा विश्वास नाही”
शरद पवार पुढे म्हणाले, “यावर महाराजांनी ज्योतिषाला म्हटलं, तु आला माझं ज्योतिष सांगायला. तुला कळलं नाही की तुझं ज्योतिष काय करणार आहे. मी आधुनिकतेचा विचार करतो, अशा भंपक गोष्टींवर माझा विश्वास नाही. मी सुधारणेचा विचार करतो हे महाराजांनी त्या ज्योतिषाला सांगितलं.”
“म्हणून आपण फुले, आंबेडकर, शाहू यांची जी नावं घेतो त्याचं कारण त्यांची दृष्टी, त्यांचा विचार समाजाला ५-५०-१०० वर्षे पुढे नेणारी होती. त्या पद्धतीने एक समाज रचना करण्यासाठी त्यांनी समाजकारण राजकारण केलं. हेच त्यांचं सूत्र होतं. त्यावर काम करणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. ही भावना ठेऊन आपण विचार केला पाहिजे. तसं वाचन केलं पाहिजे, आपली वैचारिक बैठक बसवली पाहिजे आणि नवी पीढी तयार केली पाहिजे,” असंही पवारांनी नमूद केलं.