मुंबई : महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्यभरात महायुती आणि महाआघाडीत अनेक ठिकाणी बिघाडी झाली. मनसे – राष्ट्रवादी, राष्ट्रवादी – वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी – शिवसेना (उद्धव टाकरे), अशा विचित्र युती, आघाडी झाल्याचे समोर आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुणे, पिंपरी – चिंचवडसह परभणीत एक आले आहेत, तर सहा महापालिकेत स्वबळावर लढत आहेत.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए), रिपब्लिकन पक्ष (खोरिपा) व ब्लॅक पँथर या पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला पाठिंबा घोषित केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष मिरा – भाईंदर, धुळे, लातूर, नांदेड, चंद्रपूर, नागपूर, या सहा महानगरपालिकांमध्ये स्वबळावर लढत आहे. पुणे, पिंपरी – चिंचवडसह परभणीत राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आले आहेत. काँग्रेस आणि शिवसेने (उद्धव ठाकरे) सोबत प्रत्येकी अकरा ठिकाणी आघाडी केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत पाच ठिकाणी निवडणूक लढत आहे.

वंचित बहुजन आघाडीसोबत कोल्हापूर, जळगाव, सांगली, अमरावती, या चार ठिकणी आम्ही एकत्र निवडणुक लढवणार आहोत. पनवेल, वसई – विरार. इचलकंरजी या महानगरपालिकेत शरद पवार गट स्थानिक पातळीवरील आघाड्यांमध्ये सहभागी झाला आहे. २९ महानगरपालिकांमधील २८६९ नगरसेवक पदांपैकी ७५० ठिकाणी पक्षाचे उमेदवार निवडणूक लढवित आहेत.

मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न

मुंबई महापालिकेची निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. भाजप उत्तर भारतीय नेत्यांना महापालिका प्रचारात उतरवत आहे. आजवर भाजप धार्मिक, जातीय राजकरण करीत होते. आता प्रांतवाद करीत आहे. परप्रांतीय नेते प्रचारासाठी बोलविणे म्हणजे मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचाच हा प्रयत्न आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मराठी माणसांसाठी समविचारी मतदारांना एकत्र घेऊनच मुंबईची निवडणूक लढविणार आहे, असेही शिंदे म्हणाले.

राखी जाधव यांचा निर्णय वैयक्तिक

राष्ट्रवादीच्या मुंबई जिल्हा अध्यक्ष राखी जाधव यांनी अर्ज भरण्याच्या अगोदर एक दिवस राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश करून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांचा हा वैयक्तिक निर्णय आहे. आम्ही ठाकरे बंधूंकडे प्रथम ५५ जागा मागितल्या होत्या. चर्चेनंतर आम्ही १७ जागांची मागणी केली. प्रत्यक्षात ११ जागा मिळाल्या.

आम्हाला अपेक्षित प्रमाणात जागा न मिळाल्यामुळे आमचे इच्छुक कार्यकर्ते भाजप, काँग्रेस आणि शिवसेनेत गेले आहेत. आम्ही आमच्या एकाही कार्यकर्त्यांला अजित पवार गटात जा, अशी सूचना केलेली नव्हती. सर्वांनी स्थानिक मतांची गोळाबेरीज पाहून निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी मुंबईत ११ जागा लढवित आहे, त्यातील चार जागा स्वबळावर लढवित आहोत, असेही शिंदे म्हणाले.

आंबेडकरी पक्षांचा राष्ट्रवादीला पाठिंबा

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए), रिपब्लिकन पक्ष (खोरिपा) व ब्लॅक पँथर या पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) पक्षाला पाठिंबा घोषित केला आहे. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुरोगामी विचारांनी वाटचाल करीत असलेल्या पक्षाला आम्ही पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्याची माहिती ब्लॅक पँथर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) या पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब पवार यांनी दिली.

राष्ट्रवादी पक्षाला या सर्व पक्षांनी पाठिंबा दिल्याबद्दल प्रदेशाध्यक्षांनी सर्वांचे आभार मानले. या पुढील सर्व निवडणुका आपण एकत्रितपणे सामोरे जाणार आहोत. आपली आघाडी आणखी मजबूत झाली आहे, असा विश्वासही प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केला.