मुंबई : आदिवासी समाजाने देशाची संस्कृती, परंपरा जपली आहे. जल – जंगल – जमिनीचे संरक्षण केले आहे. निसर्गाची साथ असेल अथवा नसेल, किती ही मोठे संकट आले तरी त्यांनी संस्कृतीच्या रक्षणासाठी कधीही तडजोड केली नाही. एखांद्या आदिवासीला काम करण्याची संधी मिळाली, तर ते इतिहास निर्माण करतात, असे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी काढले. मुंबईत आयोजित ‘आदिवासी संस्कृती उत्सव वनरंग – २०२६’ कार्यक्रमाला उपस्थित राहून, त्यांनी आदिवासींशी संवाद साधला.

अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवळ यांनी मुंबईत आदिवासींच्या संबंधित या उत्सवाचे आयोजन केले आहे. सांस्कृतिक कार्यक्रम महत्त्वाचा भाग आहेच, पण आदिवासी कुटुंबांमध्ये ज्या अनेक प्रकारच्या पदार्थांची निर्मिती होते त्यांचेही प्रदर्शन आयोजित केले आहे. त्यामुळे झिरवळांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे औत्सुक्य होते. आदिवासींनी पुष्कळ वर्ष जपलेली संस्कृती, संगीत आणि कला बघायला मिळाली.

या देशामध्ये १५० वर्ष इंग्रजांचे राज्य होते आणि या इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी आदिवासी जमातीने प्रचंड त्याग केला. राघोजीराव भांगरे असतील किंवा त्यांच्यासारख्या अनेकांनी ब्रिटिशांच्याविरुद्ध लढा दिला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी शौर्य दाखवले. साहजिकच आदिवासींच्या शौर्याचा इतिहास आपल्याला बघायला मिळतो. या कार्यक्रमात डॉ. विलास गवारी यांनी ‘उठाव’ आणि ‘पेठची शौर्यगाथा’ हे ग्रंथ प्रकाशित केले. हे ग्रंथ वाचल्यानंतर नव्या पिढीला प्रेरणा मिळेल, असेही पवार म्हणाले.

झिरवळांनी विधिमंडळात इतिहास निर्माण केला

नरहरी झिरवळ यांनी महाराष्ट्रात महत्त्वाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. महाराष्ट्राच्या विधानसभेत आम्हाला अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड करायची होती. आम्ही लोकांनी झिरवळांचे नाव सुचविले. काही लोक म्हणाले, सभागृह चालवणे साधी गोष्ट नाही, त्यांच्याकडून हे कसे होणार ? तरीही आम्ही त्यांना संधी दिली. त्यांचे भाग्य असे की, ते उपाध्यक्ष झाले आणि काही दिवसांतच अध्यक्षांची जागा रिक्त झाली. त्यामुळे अध्यक्षांची सगळी जबाबदारी त्यांनी समर्थपणाने चालवली.

महाराष्ट्राला हे बघायला मिळाले की, आदिवासीला संधी मिळाली तर ते इतिहास निर्माण करतात. झिरवळांनी महाराष्ट्राच्या विधिमंडळात एक इतिहास निर्माण केला. आज राज्याच्या मंत्रिमंडळात ते कॅबिनेट मंत्री म्हणून काम करतात. देशाच्या लोकसभेत आमच्या समवेत खासदार भास्कर भगरे आहेत, तेही अतिशय उत्तम काम करतात. याचा अर्थ एकच आहे की, संधी दिली पाहिजे, शक्ती दिली पाहिजे, मग आपल्याला त्यांच्या कर्तृत्वाचे दर्शन होईल. हेच काम या तीन दिवसांच्या उत्सवामधून होत आहे. या बद्दल झिरवळ यांचे अभिनंदन करतो. या कामात आम्ही त्यांच्याबरोबर आहोत, असेही पवार म्हणाले.