मुंबई : राज्यातील एक महत्त्वाचे संदर्भग्रंथालय असलेल्या दादरच्या मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची फेरनिवड झाली आहे. अध्यक्षांसह ७ उपाध्यक्ष व १५ कार्यकरणी सदस्यांच्या निवडी बिनविरोध झाल्या आहेत.
ग्रंथसंग्रहालयाची निवडणूक ३ एप्रिल रोजी आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा बुधवार शेवटचा दिवस होता. मात्र उपलब्ध जागांइतके उमेदवारी अर्ज आल्याने सर्व निवडी बिनविरोध झाल्यात जमा आहेत. या निवडीची घोषणा शुक्रवारी होईल. सात उपाध्यक्षांमध्ये डॉ. भालचंद्र मुणगेकर, विद्या चव्हाण, शशी प्रभू, प्रभाकर नारकर, महेश पवार, विनायक परब आणि डॉ. प्रदीप कर्णिक यांचा समावेश आहे.
रविंद्र गावंडे, जयवंत गोलतकर, अमेय कोंडविलकर, मकरंद केसरकर, हेमंत जोशी, प्रदीप ओगले, शिल्पा पितळे, उमा नाबर, सतीश राणे, मारुती नांदविस्कर, रमाकांत पाटील, विवेक भिडे, दिनेश राणे आणि राजेंद्र कोरडे हे १५ सदस्य कार्यकारणीवर निवडले गेले आहेत.
१५ मार्च रोजी सर्वसाधरण सभा सदस्यांसाठी मतदान झाले. संस्थेच्या ४० शाखा असून ४० सदस्यांची सर्वसाधारण सभा आहे. या संस्थेचे ७ हजार सदस्य आहेत. संस्थेच्या सर्व शाखा मुंबई आणि उपनगरात आहेत. गेली अनेक वर्ष ही संस्था विविध वादांमुळे मोठ्या चर्चेत आहे.
१९८२ पासून शरद पवार हे संस्थेच्या अध्यक्षपदी आहेत. २०२१ मध्ये पवार यांना तत्कालीन आम आदमी पक्षाचे नेते धनंजय शिंदे यांनी आव्हान दिले होते. तेव्हा २९ विरुद्ध २ मतांनी पवार विजयी झाले होते. संस्थेचा दैनंदिन कारभार प्रमुख कार्यवाह सांभाळतात. रविंद्र गावडे हे अनेक वर्षे या पदावर काम करत आहेत. सुप्रिया सुळे, संजय राऊत, अनिल देसाई, प्रताप आसबे हे संस्थेचे विश्वस्त आहेत.
संस्थेच्या समस्या कायम :
४० वर्षे शरद पवार संस्थेचे अध्यक्ष आहेत. मात्र संस्थेच्या अनेक समस्या आजही कायम आहेत. दादरला संस्थेची मोक्याच्या ठिकाणी स्वमालकीची इमारत आहे, पण, ती मोडकळीस आली आहे. संस्थेकडे ६ लाख ५० हजार ग्रंथ आहेत. नियतकालिकांच्या जतनीकरणाचा प्रकल्प कसाबसा चालू आहे. इमारतीमधील रिकाम्या जागांच्या भाडेकरारावर आक्षेप आहेत. सदस्यांअभावी संस्थेच्या शाखा बंद पडत आहेत. सुविधांअभावी ग्रंथालयांचे वर्गणीदार घटत आहेत. कर्मचाऱ्यांची वेतनवाढ अनेक वर्षे झालेली नाही.धर्मादाय आयुक्तांकडे संस्थेच्या घटना बदलासंदर्भात वाद चालू आहेत.
