महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न दोन वर्षे फसल्यानेच आता केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते वा त्यांच्या निकटवर्तीयांना लक्ष्य केले जात आहे वा भीती दाखविली जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी भाजपवर केला. कें द्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे अधिकारी समीर वानखेडे यांच्याबद्दल बऱ्याच सुरस कथा ऐकू येत असल्याची टिप्पणी त्यांनी केली. मात्र या पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच पवारांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या मुलाने एका मुलीला प्रपोज केल्याचा किस्सा सांगितल्यानंतर उपस्थित पत्रकारांमध्ये एकच हशा पिकल्याचं पहायला मिळालं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जयंत पाटलांच्या चिरंजीवांनी आयफेल टॉवरवर मुलीला केलं प्रपोज
शरद पवार यांनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच प्रदेशाध्यक्ष मंत्री जयंत पाटील यांच्या मुलासंदर्भातील एक खास बातमी दिली. “आमच्या प्रदेशाध्यक्षांच्या चिरंजीवाची ही बातमी आहे. आमचा सर्वांचा दृष्टिकोन किती व्यापक झाला आहे बघा. जयंत पाटलांच्या चिरंजीवांनी काल संध्याकाळी (मंगळवारी) पॅरिसमध्ये आयफेल टॉवरवर जाऊन एका मुलीला प्रपोज केलं. त्याला दोन्ही बाजूंनी मान्यता मिळवली. आता आम्ही वाळवास इस्लामपूरपर्यंत सीमित नाही राहिलो. आम्ही एकदम पॅरिस वगैरेला जातो,” असं पवार म्हणाले. पुढे बोलताना, “ठिकाण इंटरनॅशनल असेल, पण दोन्ही मुलं मुली डोमेस्टिक आहेत. स्थानिक आहेत. त्यामुळे त्यांचं लग्न इथंच होईल. आता आम्हाला काळजी घ्यावी लागेल. आमची मुलं कुठं जाऊन काय करतील हे सांगता येत नाही,” असे पवार यांनी सांगताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

सरकार पाडू शकत नाही म्हणून…
महाविकास आघाडीचे सरकार पाडू शकत नाही. उलट हे सरकार पाच वर्षे टिकणार हे लक्षात आल्यानेच अंमलबजावणी संचालनालय (ईडी), केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय), प्राप्तिकर विभागाचा गैरवापर करून सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांच्या विरोधात चौकशीचा ससेमिरा मागे लावण्यात आला आहे, असा आरोपही पवारांनी केलाय.

फक्त काळजी घ्या…
अजित पवार यांच्या तीन बहिणींच्या घरी गेले सहा दिवस छापे टाकले जात आहेत.  काही नेत्यांच्या मागे ईडी किं वा सीबीआयची कारवाई सुरू आहे. भाजपकडून सत्तेचा हा सारा गैरवापर सुरू आहे. या अशा कारवायांना आम्ही डगमगत नाही. फक्त काळजी घ्या, असा सल्ला पक्षाच्या मंत्र्यांना दिल्याचे पवार यांनी सांगितले.

‘समीर वानखेडे वादग्रस्त’

केंद्रीय अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे अधिकारी समीर वानखेडे यांच्याबद्दल माहिती घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्याबद्दल बरेच काही ऐकायला मिळाले. ते पूर्वी सीमाशुल्क विभागात होते तेव्हा त्यांच्या कारकिर्दीबद्दल बऱ्याच सुरस कथा कळल्या, असेही पवार म्हणाले. अंमली पदार्थाच्या विरोधात मुंबई पोलीस आणि केंद्रीय यंत्रणांनी के लेल्या कारवाईची तुलना केल्यास मुंबई पोलिसांची कामगिरी अधिक सरस आहे. केंद्रीय यंत्रणांची प्रसिद्धच जास्त दिसते असा टोला पवार यांनी लगावला.

‘फडणवीस यांना विस्मरण होत नसावे’
‘मला आजही मुख्यमंत्री असल्यासारखे वाटते’ या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाचा समाचार घेताना पवार म्हणाले, पाच वर्षे मुख्यमंत्रीपद भूषविल्यावरही त्यांना विस्मरण होत नसावे. ही चांगली गोष्ट आहे. मी राज्याचे चार वेळा मुख्यमंत्रीपद भूषविले, पण मला कधी त्याची आठवण होत नाही. देवेंद्र फडणवीस यांनी मावळ गोळीबाराची आठवण करून दिली. मावळमधील चित्र वेगळे होते. पोलिसांनी गोळीबार के ला होता. लखीमपूरमध्ये सत्ताधारी भाजपच्या मंत्र्याच्या मुलानेच शेतकऱ्यांना चिरडल्याचा आरोप झाला व त्यावरून या मुलाला अटक झाली याकडे पवार यांनी लक्ष वेधले. लखीमपूरमधील हिंसाचारप्रकरणी गृहराज्यमंत्री मिश्रा यांच्या राजीनाम्याची मागणीही त्यांनी केली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharad pawar says jayant patil son propose a girl near eiffel tower scsg
First published on: 14-10-2021 at 10:29 IST