scorecardresearch

“हे सहन केलं जाणार नाही, काही राजकीय पक्ष…”, गृहमंत्र्यांनी दिला इशारा, ‘सिल्व्हर ओक’वर झालेल्या आंदोलनाबाबत मांडली भूमिका!

वळसे पाटील म्हणतात, “न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर, कर्मचाऱ्यांनी स्वागत केल्यानंतर हा हल्ला झाला. मला वाटतं हे ठरवून झालंय”

dilip walse patil on sharad pawar silver oak
दिलीप वळसे पाटील यांचा सिल्व्हर ओकवरील आंदोलनाबाबत इशारा!

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी आज आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी अचानक धडक मोर्चा काढला. यावेळी सिल्व्हर ओकवर काही कर्मचाऱ्यांनी चप्पला देखील फेकल्याचं दृश्यांमधून दिसून आलं. अशा प्रकारे एवढ्या महत्त्वाच्या नेत्याच्या घरावर आंदोलन होणं चुकीचं असल्याची प्रतिक्रिया सर्वच पक्षांकडून व्यक्त होत असताना दुसरीकडे या आंदोलनामागे असणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिला आहे. यामागे काही अज्ञात शक्ती असल्याचं देखील गृहमंत्री म्हणाले.

दुपारी ३ च्या सुमारास काही आंदोलक एसटी कर्मचारी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शरद पवार यांना जबाबदार धरत थेट सिल्व्हर ओकपर्यंत पोहोचले. त्यातील काही कर्मचाऱ्यांनी तर थेट बंगल्याच्या गेटपर्यंत पोहोचत चपला फेकल्या. इतरही काही कर्मचाऱ्यांनी चपला फेकल्या. जवळपास अर्धा तास हा सगळा गोंधळ सिल्व्हर ओकबाहेर सुरू होता. त्यानंतर मुंबई पोलिसांनी घटनास्थळावरील परिस्थिती नियंत्रणात आणली. यादरम्यान सुप्रिया सुळे यांनी देखील आंदोलकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला.

“इंटेलिजन्स फेल्युअर असेल, तर शोधून काढू”

शरद पवारांसारख्या मोठ्या आणि महत्त्वाच्या व्यक्तीच्या घरी एवढ्या मोठ्या संख्येने लोक मार्च काढत असताना इंटेलिजन्सला याची काहीच माहिती कशी नव्हती, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “ही घटना चुकीची आहे. शरद पवार यांच्या घरावर अशा प्रकारे हल्ला होणं चुकीचं आहे. ही काळजीची गोष्ट आहे. यात इंटेलिजन्सचं फेल्युअर कुठे झालंय, ते निश्चितच शोधून काढू. आयुक्तांना यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. जे यामध्ये दोषी असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल”, असं वळसे पाटील म्हणाले आहेत.

“एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाच्या आडून…”

“समाजात कुणीही भडकाऊ विधानं करून कुणाला भडकवण्याचं काम करत असेल, तर कायदेशीर कारवाई केली जाईल. याच्या पाठिमागे एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाच्या आडून एक प्रकारची अस्वस्थता राज्यात निर्माण करण्याचा प्रयत्न काही राजकीय पक्ष, शक्ती करत आहेत. त्याचा एक भाग म्हणून शरद पवारांच्या निवासस्थानी अशी घटना घडवण्यात आली असू शकते. आम्ही त्याचा तपास करतो. हा अज्ञात शक्तींनी घडवलेला प्रकार आहे, हे सहन केलं जाणार नाही”, असं वळसे पाटील यांनी स्पष्ट केलं.

शरद पवारांच्या ‘सिल्व्हर ओक’वर आक्रमक एसटी कर्मचाऱ्यांची चप्पलफेक; सुप्रिया सुळे हात जोडत म्हणाल्या,”माझे आईवडील, मुलगी…”

“एकदा न्यायालयानं निर्णय दिला, त्याचं कर्मचाऱ्यांनी स्वागत केल्यानंतर अशा प्रकारचा आज हल्ला केला. मला वाटतं की हे सगळं ठरवून केलं असावं. याच्यामागे कुठलीतरी अज्ञात शक्ती असल्याशिवाय अशा घटना घडणार नाहीत”, असं गृहमंत्री म्हणाले. “राज्यात कायदा आणि सुव्यवस्था नाही असं दाखवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न काही लोकांकडून केला जात आहे. यामागे राजकीय हेतू असल्याचं स्पष्ट आहे”, असं देखील त्यांनी नमूद केलं

गृहमंत्र्यांचं एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन

दरम्यान, यावेळी बोलताना दिलीप वळसे पाटील यांनी आंदोलक कर्मचाऱ्यांना आवाहन केलं आहे. “एसटी कर्मचाऱ्यांना माझं आवाहन आहे की न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे त्यांनी २२ तारखेपूर्वी कामावर हजर राहावं. सरकारने त्यांना आश्वासन दिलं आहे की कोणतीही कारवाई केली जाणार नाही. त्यावर काही प्रश्न असतील तर संबंधित मंत्री कर्मचाऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतील”, असं ते म्हणाले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sharad pawar silver oak st workers agitation dilip walse patil on bjp pmw

ताज्या बातम्या