मुंबई : आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाच्या किमतीत झालेल्या घसरणीने जागतिक बाजारांमध्ये चैतन्य परतले. याचे सकारात्मक पडसाद देशांतर्गत बाजारावर उमटल्याने सेन्सेक्स आणि निफ्टी मंगळवारच्या सत्रात दमदार वाढीने बंद झाले.
आखाती देशांमधील युद्ध आणि त्या परिणामी उद्भवलेले इंधन संकट लवकरच संपुष्टात येण्याच्या अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या संकेतांमुळे खनिज तेलाच्या किमती जवळपास ७ टक्क्यांनी नरमल्या. सोमवारी पिंपामागे १२० डॉलरपर्यंत कडाडलेले तेल हे मंगळवारी ९२ डॉलरपर्यंत खाली आले. यातून वधारलेल्या जागतिक शेअर बाजारातील सकारात्मकतेचे स्थानिक बाजारातही प्रमुख निर्देशांकांत १ टक्क्यांनी वाढीचे प्रतिबिंब उमटले. मंगळवारच्या सत्रअखेर सेन्सेक्स ६३९.८२ अंशांनी म्हणजेच ०.८२ टक्क्यांनी वधारून ७८,२०५.९८ पातळीवर स्थिरावला. दिवसभरात त्याने ९६०.०९ अंशांची कमाई करत ७८,५२६.२५ पातळीवर बंद झाला. निफ्टी २३३.५५ अंशांनी वधारून २४,२६१.६० पातळीवर बंद झाला.
युद्धाच्या समाप्तीच्या शक्यतेचे संकेत देणाऱ्या ट्रम्प यांच्या टिप्पण्यांनंतर, खनिज तेलाच्या किमतीत झालेल्या तीव्र घसरणीने जागतिक स्तरावर गुंतवणूकदारांच्या भावनांमध्ये झालेल्या सुधारणेचे प्रतिबिंब दलाल स्ट्रीटवर पडले. देशांतर्गत आघाडीवर बहुतांश क्षेत्रांतील समभाग सकारात्मक पातळीवर बंद झाले, असे जिओजित इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले.
सेन्सेक्समधील आघाडीच्या ३० कंपन्यांपैकी महिंद्र अँड महिंद्र, इंटरग्लोब एव्हिएशन, मारुती, आयसीआयसीआय बँक, एशियन पेंट्स आणि अल्ट्राटेक सिमेंट यांचे समभाग वधारून बंद झाले. तर इन्फोसिस, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि भारती एअरटेलमधील समभाग घसरणीने तेजीला मर्यादित केले. मुंबई शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, सोमवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) ६,३४५.५७ कोटी रुपये मूल्याचे समभाग विक्री केले. तर, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ९,०१३.८० कोटी रुपयांचे शेअर खरेदी केले.
सेन्सेक्स ७८,२०५.९८ ६३९.८२ ०.८२
निफ्टी २४,२६१.६० २३३.५५ ०.९७
तेल ९०.२६ -९.०३%
डॉलर ९१.८५ -३६ पैसे
सोने १,६२,९७५ २,६७६ ( १.६६%)
चांदी २,७७,०८३ ९,८४० (३.६८%)
