मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपात सामील झालेल्या २३८ रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. या कारवाईबरोबरच निलंबनाचीही कारवाई सुरूच असून एकूण २ हजार ७७६ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटीतील कर्मचाऱ्यांनी २९ ऑक्टोबरपासून पुकारलेला संप मागे घेण्याचे आवाहन धुडकावल्यानंतर महामंडळाने कर्मचाऱ्यांवर कारवाई सुरू केली. नियमित कर्मचाऱ्यांवर प्रथम निलंबनाची कारवाई करण्यात आली. गेल्या दोन दिवसांत २९७ कर्मचाऱ्यांचे निलंबन केल्याची माहिती महामंडळाने दिली. त्यामुळे राज्यातील निलंबित कर्मचाऱ्यांची एकूण संख्या २,७७६ पर्यंत वाढली आहे. संपात रोजंदारीवरील २,५८४ कर्मचारीही सामील झाले. या कर्मचाऱ्यांना नोटीस पाठवून २४ तासांत कामावर हजर व्हा, अन्यथा सेवा समाप्तीची कारवाई होईल, असा इशारा देण्यात आला होता. गेल्या तीन ते चार दिवसांपासून या नोटिशीला उत्तर न देणाऱ्या कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला असून २३८ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आल्याची माहिती महामंडळाने दिली.

कर्मचाऱ्यांना विरोधाची भीती

काही कर्मचाऱ्यांनी नोटिशीला उत्तर दिले असून कामावर परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे. परंतु काम करताना संपावरील कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या विरोधाची भीती रोजंदारीवरील काही कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

तब्बल २०० कोटी रुपयांचे नुकसान

संपामुळे एसटी महामंडळाचे आतापर्यंत २०० कोटी रुपये प्रवासी उत्पन्न बुडल्याची माहिती सूत्रांनी दिली. महामंडळाने दिवाळीच्या तोंडावरच भाडेवाढ केली होती. परंतु संपामुळे वाढीव उत्पन्नही बुडाले. महामंडळाने काही प्रमाणात बससेवा सुरू केली असून शुक्रवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत १३१ बस सोडण्यात आल्या. त्यातून ३,५१७ प्रवाशांनी प्रवास केला. दादर, नाशिक, ठाणे, बोरीवली, औरंगाबाद, धुळे, जळगाव, स्वारगेट, पुणे स्टेशन, बारामती, सांगली, मिरज, इस्लामपूर, शहादा, चंदगड, राजापूर येथून शिवनेरी, शिवशाही वातानुकूलित बस आणि साध्या गाड्या सोडण्यात आल्या.