मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने सोमवारी जाहीर केलेल्या एमबीए सीईटीच्या निकालामध्ये ठाण्यातील शशांक प्रभू यांनी १०० पर्सेंटाईल मिळवत अव्वल स्थान पटकावले. त्यांनी आतापर्यंत १० वेळा एमबीए सीईटी दिली असून, तब्बल आठ वेळा सर्वोच्च पर्सेंटाईल मिळविण्याची कामगिरी केली आहे.
ठाण्यातील रहिवाशी असलेले शशांक प्रभू हे ११ वर्षांपासून एमबीएची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन करत आहेत. ते विद्यार्थ्यांना कॅट, सिम्बायोसिस राष्ट्रीय योग्यता चाचणी (स्नॅप), एमबीए सीईटीसह विविध राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षांसाठी मार्गदर्शन करीत आहेत. दरवर्षी बदलणारी परीक्षा पद्धत, प्रश्नांचा प्रकार, काठिण्य पातळी, अवघड पेपर आल्यास त्याला कसे समोरे जावे यासाठी आवश्यक रणनितीचे विश्लेषण करण्यासाठी, तसेच अनेक विद्यार्थ्यांना किती गुणांवर किती पर्सेंटाईल मिळतील, कोणत्या महाविद्यालयांमध्ये अर्ज करायचा याची माहिती नसते. त्यामुळे याबाबत विद्यार्थ्यांना अचूक मार्गदर्शन करता यावे यासाठी स्वत: एमबीए सीईटी देत असल्याचे प्रभू यांनी सांगितले.
मागील काही वर्षांपासून सीईटी कक्षाकडून उत्तरतालिका उपलब्ध करून देत असल्याने विद्यार्थ्यांना ट्रेंड समजून घेणे सोपे झाले आहे. कोणत्या विषयावर किती प्रश्न विचारले जात आहेत, प्रश्नांचा पॅटर्न कसा बदलतो, याचे विश्लेषण परीक्षा देत असल्यामुळे करता येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
सीईटीमध्ये वेळेचे व्यवस्थापन महत्त्वाचे
एमबीए सीईटीमध्ये वेळेचे व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे आहे. १५० मिनिटांत २०० प्रश्न सोडवायचे असतात. म्हणजे प्रत्येक प्रश्नासाठी सरासरी ४५ सेकंद मिळतात. प्रत्यक्ष परीक्षेच्या वेळी प्रश्न कसा सोडवायचा याचा विचार करत बसलो, तर ती सर्वांत चुकीची रणनीती ठरते. प्रत्येक प्रश्न प्रकारासाठी स्वतःची पद्धत आधीच तयार असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे कठीण प्रश्नांमध्ये वेळ वाया घालवण्याऐवजी आधी सोपे प्रश्न सोडवणे अधिक महत्त्वाचे असते. अनेक विद्यार्थी एखाद्या कठीण प्रश्नावर तीन-चार मिनिटे खर्च करतात आणि शेवटचे १५-२० प्रश्न बघायलाही त्यांना वेळ मिळत नाही. रणनीती आणि वेग या दोन्ही गोष्टी यशासाठी निर्णायक ठरतात, असेही प्रभू यांनी सांगितले.
… म्हणून शिक्षण क्षेत्राकडे वळालो
शशांक प्रभू यांनी एमबीबीएस केल्यानंतर एमबीए केले. त्यानंतर ते आयटीसीमध्ये असिस्टंट मॅनेजर म्हणून काम करत होते. कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये प्रत्येक व्यक्तीला पर्याय असतो. एमबीएबाबत २००८ मध्ये फार लोकांना माहिती नव्हती. एमबीएची प्रवेश प्रक्रिया, कोणते महाविद्यालय चांगले यासाठी त्यांनी अनेकांकडे विचारणा केली. त्यामुळे एमबीएसाठी आपण घेतलेली मेहनत, क्षमता आणि अनुभव याला अन्य कोणीही पर्याय असू शकत नाही, हे त्यांच्या लक्षात आले. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मिळणारे समाधान आणि आपल्या अनुभवाचा इतरांना उपयोग होऊ शकतो, हे लक्षात आल्यानंतर त्यांनी पूर्णवेळ शिक्षण क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला.
२०१० मध्ये प्रथम सीईटी दिली
प्रभू यांनी २०१० मध्ये पहिल्यांदा सीईटी दिली. त्यावर्षी त्यांना १०० पर्सेंटाईल मिळाले होते. त्यानंतर आतापर्यंत १० वेळा सीईटी दिली असून, आठ वेळा सर्वोच्च पर्सेंटाईल मिळाले आहेत. २०१० मध्ये परीक्षा पेन-पेपर या पद्धतीने ओएमआर शीटवर घेण्यात येत होती. २०१५ नंतर परीक्षा संगणकाधारित झाली. आता परीक्षा अधिक संघटित स्वरूपात घेतली जाते. मात्र प्रचंड स्पर्धा वाढल्याचे त्यांनी सांगितले. पूर्वी परीक्षेमध्ये काही चुका झाल्या तरी चांगले महाविद्यालय मिळण्याची शक्यता होती. मात्र प्रत्येक गुणांसाठी विद्यार्थ्यांना मेहनत घ्यावी लागत होते.
जमनालाल बजाज व्यवस्थापन संस्थेत विद्यार्थ्यांचे प्रवेश
त्यांनी २०१५ पासून नामांकित प्रशिक्षण संस्थांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. आयएमएस या संस्थेमध्ये त्यांनी सहा वर्ष ‘कॅट’ कार्यक्रमाचे संचालक म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यापूर्वी ते अन्य एका प्रशिक्षण संस्थेमध्ये काम करत हाेते. त्यांनी २०२४ मध्ये स्वतःची ‘पॉइंट ९९’ ही प्रशिक्षण संस्था सुरू केली. गेल्या वर्षी त्यांच्या संस्थेतील सहा विद्यार्थ्यांना मुंबईतील नामांकित जमनालाल बजाज व्यवस्थापन संस्थेत प्रवेश मिळाला होता. सध्या वर्ग लहान असले तरी विद्यार्थ्यांना वैयक्तिक पातळीवर मार्गदर्शन करण्यावर भर देण्यात येत असल्याचे प्रभू यांनी सांगितले.
