भारत असहिष्णू देश नसल्याचे सांगत भाजप नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी अभिनेता आमीर खाने याने असहिष्णुतेसंदर्भात केलेल्या वक्तव्याबद्दल असहमती दर्शवली. आपण आमीर आणि त्याच्या कुटुंबाचे चाहते आहोत; परंतु भारत असहिष्णू बनत चालल्याची टीका आपल्याला अमान्य आहे. भारत हा शांतताप्रिय देश असून येथील प्रत्येक जात, धर्म, पंथ यांचा सन्मान होतो. भारत हा सहिष्णू असल्यामुळेच देव-धर्मावर टीका असलेला त्याचा ‘पीके’ चित्रपट यशस्वी ठरला, असे मत त्यांनी ट्विटरवरून व्यक्त केले. आमीरवर अभिनेत्री रविना टंडन, दिग्दर्शक रामगोपाल वर्मा, अभिनेते परेश रावल आदींनीही टीका केली आहे.

ममतादिदींकडून आमिरची पाठराखण

कोलकता : लोकशाही पद्धतीने व्यक्त होण्याचा अधिकार आमिर खानला असल्याचे सांगत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांप्रदायिकतेविरोधात बोलल्याबद्दल आपल्याला तुरुंगात टाकण्याचे आव्हान केंद्र सरकारला दिले. हा देश सर्वाचा असून देश सोडण्याचा सल्ला देण्याचा अधिकार कुणालाही नाही, अशा शब्दांत आमिरला पाकिस्तानात जाण्याबद्दल सुचवणाऱ्यांना त्यांनी फटकारले. केंद्र सरकारवर टीका करताना हिंदुत्ववादी संघटनांनाही त्यांनी फटकारले. त्या म्हणाल्या की, गोमांस खाल्ले म्हणून मारण्याचा अधिकार कुणालाही नाही. देशात त्यांच्याविरोधात कुणीही बोलू नये, अशी त्यांची अपेक्षा असते. आपण काय बोलावे, हे ते ठरवणार. आमिरची पत्नी त्याला जे म्हणाली आणि त्याला जे वाटलं, ते तो बोलला. आता त्याला देश सोडण्याचे सल्ले दिले जात आहेत. शाहरूख खान आणि ए. आर. रहमानलाही असेच सल्ले दिले गेले. हा देश सर्वाचीच मातृभूमी आहे.