सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेली डोंबिवलीची शोरमा गर्ल एकता सावंत हिने नुकतीच मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. शोरमा गर्ल नावाने इन्स्टाग्रामवर लोकप्रिय असणाऱ्या एकता सावंत हिचे लाखो फॉलोअर्स आहेत. ती डोंबिवलीत रस्त्यावर शोरमाचा स्टॉल लावायची. मात्र, या स्टॉलवर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने अनेकदा कारवाई केली होती. यानंतर मनसेचे नेते अविनाश जाधव हे शोरमा गर्लच्या मदतीला धावून आले होते. त्यांनी राज ठाकरे यांचा फोटो असलेला स्टॉल एकता सावंत हिला दिला होता. त्यानंतर इन्स्टाग्रामवर एकता सावंत हिची लोकप्रियता आणखीनच वाढली होती.

एकता सावंतला मनसेने केली होती मदत

एकता सावंतवर कारवाई झाली होती. त्यानंतर मनसेने केलेल्या मदतीमुळे एकता सावंत हिचा शोरमाचा व्यवसाय पुन्हा सुरु झाला होत्या. त्याबद्दल राज ठाकरे यांचे आभार मानायला एकता सावंत राज ठाकरेंच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी गेली होती. राज ठाकरे यांना भेटल्यानंतर एकता सावंत हिने त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या पाया पडली. शोरमा गर्लने राज ठाकरे यांना भेट म्हणून एक घड्याळ आणले होते. घड्याळाची पिशवी तिने राज ठाकरे यांच्या हातात ठेवली तेव्हा त्यांनी यामध्ये काय आहे, असे एकता सावंतला विचारले. त्यावर तिने घड्याळ असे उत्तर दिले. तेव्हा राज ठाकरे यांनी ‘मला घड्याळ नको, तू मला मस्तपैकी शोरमा घेऊन ये’, असे सांगत हे घड्याळ एकता सावंतला परत दिले. यानंतर एकता सावंत हिने शर्मिला ठाकरे यांचीही भेट घेतली आणि नमस्कार करुन आशीर्वादही घेतले. एकताने तिच्या इन्स्टाग्रामवर राज ठाकरेंच्या भेटीचा फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केला आहे.

लढत राहिले, काम करत राहिले-एकताची पोस्ट

लढत राहिले.. काम करत राहिले.. आणि आज राज ठाकरे साहेबांनी दिलेली शाबासकी माझ्यासाठी सर्वात मोठं बक्षीस ठरलं! असं कॅप्शन देत एकताने व्हिडीओ पोस्ट केला आहे. तसंच ‘आज राज ठाकरे साहेबांना भेटण्याचा योग आला… आणि त्यांच्याकडून मिळालेली शाबासकी म्हणजे माझ्यासाठी मोठा आशीर्वाद! ‘ अशी कॅप्शन देत फोटो पोस्ट केले आहेत.