मुंबई : शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांच्या बनावट चित्रफीतीनंतर अनोळखी व्यक्ती त्यांचा पाठलाग करत असल्याची तक्रार त्यांनी दादर पोलिसांकडे केली. सोमवारी आईला भेटून परतत असताना शिवाजी पार्क परिसरात दुचाकीवरील दुकलीने त्यांचा पाठलाग केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दादर पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी याप्रकरणी दोन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवला असून अधिक तपास सुरू आहे.
बोरिवली परीसरात राहणाऱ्या शितल म्हात्रे (४८) यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, १३ मार्च रोजी नेहमीप्रमाणे शिवाजी पार्क परीसरात राहणाऱ्या आईला भेटण्यासाठी गेल्या होत्या. आईला भेटून दुपारी ३ ते ३.३० च्या सुमारास चर्चगेट येथील बाळासाहेब भवनच्या दिशेने निघाल्या होत्या. त्यावेळी चालक विशाल जाधव, तसेच सुरक्षेसाठी नेमणूकीस असलेले पोलीस महाले देखील वाहनात होते. शिवाजी पार्क येथून वीर सावरकर मार्गाने पुढे जात असताना किर्ती महाविद्यालय जंक्शन या ठिकाणी दोन जण पाठलाग करत असल्याचे पोलिसाने सांगितले. त्यांनी वळून पाहताच, दुचाकीवरील व्यक्ती, वाहनाजवळ येवून वारंवार टक लावून पाहत असल्याचे दिसले.
तसेच दोघांपैकी मागे बसलेली व्यक्ती त्यांच्या दिशेने हातवारे करत होती. ती हल्ला करण्याची भीती वाटल्याने त्यांनी वाहन चालकास गाडीचा वेग वाढविण्यास सांगितला. त्यानुसार, ते पुढे निघून गेले. दादर पोलीस ठाणे गाठून मंगळवारी सायंकाळी त्यांनी घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानुसार, दादर पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४ (डी), ३५२ आणि ३४ अंतर्गत दोन अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे दादर पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.