वरळीत असलेल्या शिवसेनेच्या शाखेची आणि तेथील बाळासाहेब ठाकरेंच्या शिल्पाची दुरावस्था झाली आहे. यावरून शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार आदित्य ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. वरळी विधानसभेचे युवराज आमदार आहेत. पण, शिवसेनेच्या शाखेवर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो नाही. येथील शिल्पाची दुरावस्था झाली असून, त्याचं उद्घाटनही झालं नाही. यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत, अशी टीका शीतल म्हात्रेंनी आदित्य ठाकरेंवर केली. त्या वरळीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होत्या.
“आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या संपत्तीचे नसून, विचारांचे वारसदार आहोत. एकीकडे सांगायचं आमचा बाप पळवला, दैवत पळवले. पण, जिथे दैवत नाव दिलं, तिथे फोटो सुद्धा नाहीसा झाला आहे. फक्त राजकारण करत बाळासाहेब आमचे आहेत दाखवायचं. आम्ही कधीच म्हणत नाही, बाळासाहेब ठाकरे आमचे आहेत,” असं शीलत म्हात्रेंनी सांगितलं.
“आम्ही कोणताही वाद करण्यासाठी आलो नाही. श्रेयाची लढाई आम्ही कधीच लढली नाही. बाळासाहेबांच्या फोटोची आणि विचारांची दुर्दशा करण्यात आली आहे. ती व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करतोय. आम्ही वाद अथवा शाखा ताब्यात घेण्यासाठी आले नाही,” असं स्पष्टीकरण शीतल म्हात्रेंनी दिलं.