सांगली : कवठेमहांकाळ तालुक्यातील मेंढपाळ समाजातील महिला बचत गटाने लोकरीपासून तयार केलेल्या विविध ३९ प्रकारच्या वस्तू आता जागतिक बाजारासाठी ‘अ‍ॅमेझॉन अ‍ॅप’वर उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या विक्रीचा प्रारंभ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्या हस्ते आरोग्य सभापती आशा पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला. जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील ढालगाव येथे मोठ्या प्रमाणात मेंढपाळांची कुटुंबे वास्तव्यास आहेत. मेंढीपासून मिळणाऱ्या लोकरपासून विविध प्रकाराचे उत्पादन पारंपरिक पध्दतीने केले जाते. या उत्पादनांना जागतिक पातळीवर ‘ऑनलाइन’ विक्रीची व्यवस्था जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून करण्यात आली. लोकरीपासून तयार करण्यात येत असलेले जेन, घोंगडी, पायपुसणी, लोकरी चप्पल, योगा चटई आदी ३९ गृहउपयोगी वस्तू महिला बचत गटाच्या माध्यमातून तयार करण्यात येतात.

ढालगाव येथील हिरा स्वयंसहायता समूह या बचत गटाने तयार केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी ‘अ‍ॅमेझॉन ऑनलाइन ई शरॉंपग’ या ‘अ‍ॅप’चे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, प्रकल्प संचालक विजर्यंसह जाधव, अतुल नांद्रेकर आणि महिला बचत गटाच्या प्रतिनिधी उपस्थित होते.