मुंबई : पर्युषण पर्व काळात म्हणजेच ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या कालावधीत संपूर्ण राज्यात पशुहत्या आणि मांस विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्यात यावी या मागणीसाठी बुधवारी उच्च न्यायालयात जनहित याचिका करण्यात आली. या याचिकेवर गुरुवारी सुनावणी होणार आहे,शेठ मोतीशॉ लालबाग जैन चॅरिटीजच्या वतीने ही याचिका करण्यात आली. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर ही याचिका बुधवारी सादर करण्यात आली. त्यावेळी, याचिकेवरील सुनावणी न्यायालयाने गुरूवारी ठेवली. तसेच, राज्य सरकार आणि महानगरपालिकेला याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.
याचिकेतील मागणीबाबत याचिकाकर्ते आणि इतर ३० जैन धर्मादाय ट्रस्टनी बृहन्मुंबई महानगरपालिका व संबंधित यंत्रणांना विविध निवेदने दिली. परंतु, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने याचिका केल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. पर्युषण पर्वाचे पवित्र स्वरूप विचारात घेता जैन समाजातील नागरिकांना राज्याच्या जवळपास सर्व भागांमध्ये या कालावधीत सुरू असलेल्या प्राण्यांच्या कत्तलीचे साक्षीदार होण्यास भाग पाडले जाते, असा दावाही याचिकाकर्त्यांनी केला आहे. तसेच, पर्युषण काळात पशुहत्या आणि मांसविक्रीवर तात्पुरत्या बंदीची मागणी केली आहे.