मुंबई: ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती’ योजनेतील पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी बुधवारी दुपारी जाहीर होणार आहे. या यादीतील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात आषाढी एकादशी दिवशी शनिवारी निधी हस्तांतरीत केला जाणार आहे.

राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार ५८५ कोटी रुपयांचा लाभ देणारी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ जाहीर केली आहे. या योजनेत ज्यांचे कर्ज दोन लाखांपेक्षा कमी आहे, त्यांना संपूर्ण कर्जमाफी माफी देण्यात येणार असून दोन लाखापेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनी त्यांची दोन लाख रुपयांच्या वरची थकबाकी ३१ मार्च २०२७ पूर्वी भरल्यास सरकारकडून त्यांच्या कर्ज खात्यात दोन लाख रुपये जमा केले जाणार आहे. तर नियमित परतफेड करणार्या शेतकर्यांना पन्नास हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे.

मात्र या योजनेतील काही जाचक अटींना विरोध करीत विरोधक आणि सत्ताधारी पक्षाकडून सरसकट कर्जमाफीची मागणी लावून धरण्यात आली होती. त्याची दखल घेत या योजनेतील जाचक अटी रद्द करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात केली होती. त्यानुसार महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनाही आता दोन लाखारपर्यंत लाभ दिला जाणार असून नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी २०२६-२७ मध्ये कर्जाची उचल करुन वेळेत परतफेड करण्याची अट रद्द करण्यात आली आहे.

या सुधारणेमुळे २०१९ महात्मा फुले शेतकरी सम्नान योजनेच्या कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या सुमारे १३ लाख शेतकऱ्यांसाठीची कर्जमाफीची ५० हजार रुपयांपर्यंतची मर्यादा रद्द करून, नियमित म्हणजेच २ लाखापर्यंत कर्जमाफी मिळणार आहे. तर सन २०२६-२७ मधील नियमित कर्ज परतफेडीची अट रद्द केल्याने २३ लाख शेतकऱ्यांनाही प्रोत्साहनपर ५० हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उद्या शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर केली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची घोषणा केली. त्यानुसार सहकार विभाग दुपारी ही यादी जाहीर करणार असून पहिल्या टप्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाचे कर्जधारक ७ लाख ५० हजार शेतकऱ्यांची यादी जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर राष्ट्रीयकृत बँकांची यादी जाहीर केली जाणार आहे. आषाढी एकादशीला शनिवारी पंढरपूरात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात निधीचे वितरण केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.