मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीला लक्ष्य करून कृत्रिम बुद्धीमत्तेचा (एआय) वापर करून तयार केलेली छायाचित्रे आणि चित्रफिती संबंधित सर्व संकेतस्थळांवरून तात्काळ हटवून टाका, असे आदेश उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिले. हे बनावट साहित्य अत्यंत धक्कादायक आणि त्रासदायक असल्याचे सकृतदर्शनी निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले.
आपल्याशी संबंधित एआय-निर्मित डीपफेक प्रतिमा विविध संकेतस्थळांवर, समाजमाध्यमांवर प्रसारित होत असल्याचा दावा करून शिल्पा हिने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. तसेच, या प्रकरणी दिलासा देण्याची मागणी केली होती. ही छायाचित्रे अश्लील स्वरुपाची असून यापैकी काही प्रतिमा केवळ दोन दिवसांपूर्वीच ऑनलाइनवर प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यामुळे या प्रकरणी न्यायालयाच्या तातडीच्या हस्तक्षेपाची गरज असल्याचा युक्तिवाद शिल्पा हिच्या वतीने केला. तसेच या बनावट अश्लील छायाचित्रांमुळे शिल्पा हिच्या प्रतिष्ठेला गंभीर नुकसान होत असल्याचेही न्यायालयाला सांगण्यात आले.
न्यायालयाने छायाचित्रे पाहिल्यानंतर हे सर्व धक्कादायक असून त्यामुळे याचिकाकर्तीच्या व्यक्तिमत्त्व हक्कांचे उल्लंघन झाल्याची टिप्पणी केली. शिल्पा हिच्या या अधिकारांत, खासगी जीवन जपण्याचा आणि प्रतिष्ठेचा अधिकार, तसेच स्वामित्त्व हक्क कायद्यांतर्गत तिच्या नैतिक अधिकारांचा समावेश असल्याचे निरीक्षण न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या एकलपीठाने नोंदवले. त्याचप्रमाणे, प्रकरणाच्या या टप्प्यावर स्वामित्त्व हक्क कायद्यांतर्गत व्यक्तिमत्त्वाच्या हक्कांच्या व्यापक मुद्यावर निर्णय देत नसल्याचे स्पष्ट करून हा मुद्दा नियमित न्यायालयासमोर निर्णयासाठी खुला ठेवण्यात येत आहे, असे एकलपीठाने स्पष्ट केले.
न्यायालयाचे म्हणणे…
याचिकेसह सादर केलेली छायाचित्रे अत्यंत वेदनादायक असून कोणत्याही परिस्थितीत त्याचे समर्थन केले जाऊ शकत नाही. कोणत्याही व्यक्तीला, विशेषतः स्त्रीला, अशा प्रकारे चित्रित केले जाऊ शकत नाही. त्यामुळे तिच्या खासगीपण जपण्याच्या मूलभूत अधिकारावर परिणाम होईल. हे अत्यंत घृणास्पद आणि निंदनीय कृत्य असल्याचे निरीक्षण न्यायालयाने शिल्पा हिला दिलासा देताना नोंदवले, शिल्पा हिलाही खासगीपण जपण्याचा आणि सन्मानाने जगण्याचा मूलभूत हक्क आहे, कोणत्याही परिस्थितीत त्याच्याशी तडजोड केली जाऊ शकत नाही. तसेच असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असे नमूद करून नोंदवून न्यायालयाने प्रकरणातील सर्व प्रतिवाद्यांना त्यांच्या संबंधित व्यासपीठावरून शिल्पा हिची छायाचित्रे आणि चित्रफिती तातडीने हटवण्याचे आदेश दिले.
