मुंबई : विरोधकांमधील काहींनी बराच त्रास दिला असला तरी त्यांना आधीच माफ केले आहे, कोणतीही कटुता उरलेली नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी येथे दिली. मात्र शिमगा एक-दोन दिवस असतो, वर्षभर नाही. त्यामुळे वर्षभर सभ्य माणसाप्रमाणे राहण्याचा प्रयत्न करावा, असा आपला एक-दोन विरोधी पक्षाच्या नेत्यांना सल्ला असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
भाजप प्रदेश उपाध्यक्ष कृपाशंकरसिंह यांनी जुहू येथे होळी व धुळवड महोत्सवाचे आयोजन केले होते. त्यासाठी महिला व बालकल्याणमंत्री मंगलप्रभात लोढा, भाजप खासदार दिनेश यादव ऊर्फ निरहुआ, मनोज तिवारी आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, काही विरोधी नेत्यांनी खूप त्रास दिला. त्याचा बदला घ्यायचा आहे. हा बदला म्हणजे त्यांना माफ केले, हे मी विधानसभेत आधीच सांगितले आहे. त्यामुळे विरोधकांबद्दल कोणतीही कटुता उरलेली नाही.
विरोधी पक्षातील काही नेते वर्षभर शिमगा करीत असतात. उत्तर भारतात किंवा महाराष्ट्रातही एक-दोन दिवसच शिमगा असतो. त्यामुळे या नेत्यांनीही वर्षभर सभ्यपणाने राहावे, अशी टिप्पणी फडणवीस यांनी केली. राज्यातील काही भागांत होत असलेला अवकाळी पाऊस चिंताजनक आहे. त्याचे क्षेत्र सध्या कमी असले, तरी शेतकऱ्यांचे नुकसान मोठे आहे. त्यामुळे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहून मदत करेल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.