कुलदीप घायवट, लोकसत्ता

मुंबई : भारताचे बर्डमॅन, पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली यांच्या नावाने रायगड जिल्ह्यातील अलिबागजवळील किहिम गावात पक्षी अभ्यास व संशोधन केंद्र आकारास येत होते. या केंद्राचे पहिल्या टप्प्यातील कामही पूर्ण झाले. मात्र, सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने महाविकास आघाडी सरकारच्या विविध प्रकल्पांसह या केंद्राच्या कामालाही स्थगिती दिली. परिणामी, पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली अभ्यास आणि संशोधन केंद्राचे काम रखडले आहे.

Farmers, Farmers news,
प्रकल्प घोषणेपूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे
Northwest Mumbai beautification of Jogeshwari Caves is sometimes under construction awaiting rehabilitation
आमचा प्रश्न : वायव्य मुंबई – जोगेश्वरी गुंफेचे सुशोभीकरण कधी प्रकल्पबाधितही पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत
illegal constructions thane marathi news
ठाण्यात बेकायदा बांधकामांवर १५ एप्रिलपासून कारवाई, ठाणे महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आदेश
Eight housing projects on track due to Central government Swamih fund
राज्यातील रखडलेल्या गृहप्रकल्पांना संजीवनी! केंद्राच्या ‘स्वामीह’ निधीमुळे आठ प्रकल्प मार्गी

डॉ. सलीम अली यांचे किहिम गावात काही काळ वास्तव्य होते. या वेळी त्यांनी सुगरण पक्ष्याचे वर्तन, प्रजननकाळ याबाबत बारकाईने संशोधन केले होते. त्यामुळेच रायगड जिल्हा परिषद, वन विभागातर्फे किहिम येथे पक्षी अभ्यास केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला होता. पर्यटनाला चालना देणे, वेगवेगळय़ा पक्ष्यांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी किहिममधील जिल्हा परिषदेच्या शाळेत पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली यांच्या नावाचे केंद्र सुरू करण्यात येणार होते. या प्रकल्पाचे भूमिपूजन जानेवारी २०२२ मध्ये करण्यात आले. सुमारे एक कोटी ७५ लाख रुपये खर्च करून हा प्रकल्प उभारण्यात येणार होता.

साधारण १५ वर्षांपूर्वी पटसंख्येअभावी बंद झालेल्या किहिम गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या ३० गुंठा जागेवर हा प्रकल्प साकारण्यात येणार होता. या केंद्राचे दोन टप्प्यांत काम करण्यात येत होते. पहिल्या टप्प्यातील संरक्षक भिंत, शाळेची दुरुस्ती करण्यात आली. त्यानंतरच्या कामाला स्थगिती मिळाल्याने प्रकल्प रखडला. इमारतीवरील कौलारू छप्पर काढून स्लॅब टाकण्याचे काम अपूर्ण राहिले आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यातील कामेही रखडली आहेत. या प्रकल्पावरील स्थगिती उठविल्यास उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करता येतील, असे वन विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

डॉ. सलीम अली यांनी पक्षी अभ्यास व पक्षी संरक्षणासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. त्यांच्या नावाने किहिम गावात पक्षी अभ्यास केंद्र उभारण्याचा राज्य सरकारचा निर्णय कौतुकास्पद आहे. ही वास्तू उभी राहताच पक्षी अभ्यासासाठी लागणाऱ्या गोष्टी बीएनएचएसकडून उपलब्ध करण्यात येणार आहेत. हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हायला हवा.

– किशोर रिठे, मानद सचिव, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस)

जिल्हा परिषदेच्या बंद शाळेच्या जागेवर पक्षी अभ्यास व संशोधन केंद्र उभारण्यात येत होते. प्रादेशिक पर्यटन विभागाने सुमारे ५० ते ५५ लाख रुपये खर्च करून पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण करण्यात आले होते. मात्र, या केंद्राच्या कामाला स्थगिती मिळाल्याने प्रकल्पच रखडला. या प्रकल्पावरील स्थगिती उठवून किहिम गावाची नवीन ओळख निर्माण करून पर्यटनवाढीला चालना देणे आवश्यक आहे.

– अदिती तटकरे, रायगड जिल्ह्याच्या तत्कालीन पालकमंत्री