Shinde Fadnavis Resolution of Homeless Maharashtra Five lakh houses built in 100 days ysh 95 | Loksatta

बेघरमुक्त महाराष्ट्राचा शिंदे-फडणवीसांचा संकल्प; १०० दिवसांत पाच लाख घरे बांधणार

सन २०२४ पर्यंत ‘सर्वासाठी घरे’ देण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राज्यात अमृत महाआवास अभियानाच्या माध्यमातून येत्या १०० दिवसांत पाच लाख घरे बांधण्यात येणार आहेत.

mh devendra fadanvis eknath shinde
शिंदे-फडणवीस

मुंबई :  सन २०२४ पर्यंत ‘सर्वासाठी घरे’ देण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी राज्यात अमृत महाआवास अभियानाच्या माध्यमातून येत्या १०० दिवसांत पाच लाख घरे बांधण्यात येणार आहेत. तसेच विविध योजनांमध्ये न बसणाऱ्यांसाठीही नवी योजना लवकरच आणण्यात येणार असल्याचे सांगत बेघरमुक्त महाराष्ट्राचा संकल्प शिंदे-फडणवीस सरकारने गुरुवारी येथे सोडला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित अमृत महा आवास अभियानाचा शुभारंभ व पुरस्कार वितरण कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.

राज्यात सर्वाना घरे मिळावीत यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. यासाठी सर्वसामान्य लोकांना समोर ठेवून लोकहिताचे निर्णय घेण्यात येत आहेत. राज्याच्या विकासासाठी कुठेही निधी कमी पडू दिला जाणार नाही. त्यामुळे ग्रामीण विकास यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी दर्जेदार आणि वेळेत घरे देण्यासाठी प्रयत्नशील राहावे अशी सूचना शिंदे यांनी केली. तर अमृत महाआवास योजनेत मार्चअखेर पाच लाख घरकुले बांधण्यात येतील. या बेघर आणि गरजू लोकांच्या व्यतिरिक्त जे नागरिक महाआवास योजनेच्या निकषात बसत नाही, अशा नागरिकांना निकषात बसण्यासाठी नवीन योजना तयार करून ‘बेघरमुक्त महाराष्ट्र’ करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

गरजूंसाठी..

बेघर व गरजूंना हक्काची घरे मिळावी यासाठी त्यांना जमिनी देणे, अतिक्रमण नियमानुकूल करणे, दिलेले उद्दिष्टे वेळेत पूर्ण केली जाणार आहेत. ग्रामीण विकास यंत्रणेद्वारे लाभार्थ्यांना निधीचा पहिला हप्ता वेळेत दिला तर उर्वरित प्रकल्प जलदरीत्या पूर्ण होतो. घरकुलांसाठी सध्या पाच ब्रास रेती उपलब्ध करण्यात आली आहे. ग्रामीण मार्टच्या माध्यमातून घरकुलांसाठी साहित्य उपलब्ध होत असल्याने एक नवीन इको सिस्टीम तयार झाली आणि यातूनही मोठा रोजगार निर्माण झाला असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-11-2022 at 01:12 IST
Next Story
मुंबईत गोवरचा आणखी एक बळी; रुग्णांची संख्या २५२