उमाकांत देशपांडे

मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपने मनसेशी उघड युती न करता छुपे सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटासाठी ८०-९० जागा सोडण्याचा भाजपचा प्रस्ताव असून, त्यांनी मनसेशी युती करून त्यांना आपल्या वाटय़ातील जागा द्याव्यात, असा भाजपचा विचार आहे. न्यायालयीन लढाईत चित्र स्पष्ट झाल्यानंतर योग्य वेळी याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे समजते.

Why did Sunetra Pawar say The relationship will improve after the election
सुनेत्रा पवार का म्हणाल्या… निवडणुकीनंतर नात्यात सुधारणा होईल
Jan Vikas Foundation supports Dr Prashant Padole of Congress
भंडारा : जनविकास फाऊंडेशनचा काँग्रेसचे डॉ. प्रशांत पडोळेंना पाठिंबा, माजी आमदार चरण वाघमारेंची भूमिका स्पष्ट
VAishali Darekar on shrikant shinde
श्रीकांत शिंदेंची उमेदवारी जाहीर; ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर म्हणाल्या, “एकवेळ चौक कमी पडतील…”
Displeasure of office bearers in BJPs election planning meeting
अलिबाग : भाजपच्या निवडणूक नियोजन बैठकीतही पदाधिकाऱ्यांचा नाराजीचा सूर…

भाजप नेते आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबरोबर गाठीभेटी वाढल्या आहेत. मात्र, मनसेशी थेट युती करण्याची भाजपची तयारी नाही. शिवसेना आणि मनसे एकत्र येऊ नये आणि शिवसेनेची मराठी मतपेढी फोडण्यासाठी मनसेचा वापर करावा, अशी भाजपची रणनीती आहे.

 भाजपने शिंदे गटाबरोबर युती करून निवडणूक लढविण्याचे जाहीर केले आहे. शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह मिळते का आणि शिवसेनेतील किती नगरसेवक शिंदे गटाकडे येणार, यावर किती जागा सोडायच्या, याविषयी निर्णय होईल. मनसेशी वेगळी युती करून त्यांना जागा सोडणे भाजपला शक्य नसल्याने छुप्या सहकार्याची रणनीती आखण्यात आली आहे. त्यामुळे शिंदे गटाशी युती म्हणून त्यांना ८०-९० जागा सोडायच्या आणि प्रभागांमधील ताकदीनुसार शिंदे गटाने त्यामधून मनसेच्या उमेदवारांसाठी जागा सोडायच्या, असे तूर्त ठरविण्यात आले आहे. मनसेकडे अनेक जागांवर चांगले उमेदवार नसले तरी शिवसेनेच्या मराठी मतांचे विभाजन करण्यासाठी भाजप त्यांचा वापर करण्याचे संकेत आहेत. मनसे जिथे निवडून येऊ शकते, त्या जागांवर भाजप उमेदवार देणार नाही, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधितांना दिल्याचे समजते. काँग्रेस, समाजवादी व अन्य पक्ष, मुस्लिमबहुल विभाग अशा सुमारे ४० जागांवर भाजप निवडून येऊ शकत नाही. गेल्या निवडणुकीत भाजपने १९४ जागा लढवून ८२ जागांवर विजय मिळविला होता. आता शिंदे गट व मनसेसाठी जागा सोडाव्या लागणार असल्याने भाजपला जिंकून येण्याचा टक्का (स्ट्राईक रेट) वाढवावा लागणार आहे, असे ज्येष्ठ भाजप नेत्याने सांगितले.  राज्यातील सत्तासंघर्षांवर सर्वोच्च न्यायालयातील पाच सदस्यीय घटनापीठापुढे २७ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. मूळ शिवसेना कोणाची आणि धनुष्यबाण कोणाकडे राहणार, याबाबत निर्णय घेण्याची परवानगी केंद्रीय निवडणूक आयोगास देण्यात आली तर ऑक्टोबरमध्ये निर्णय होऊ शकतो. मात्र, ती न मिळाल्यास निवडणूक आयोग धनुष्यबाण चिन्ह गोठवून दोन्ही गटांना स्वतंत्र चिन्ह मिळू शकते. तसे झाल्यास रणनीती बदलली जाईल, असे सूत्रांनी सांगितले. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयात प्रभाग रचनेविषयीची याचिका प्रलंबित असून, त्यावर निर्णय झाल्यावरच निवडणूक कधी होणार, हे स्पष्ट होणार आहे. त्यानंतरच रणनीती व जागावाटपाचा निर्णय घेतला जाईल, असे संबंधितांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि भाजप हे युतीत निवडणुका लढणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. सध्या जागावाटपाबाबत कोणतीही चर्चा झाली नसून, पक्ष योग्य वेळी निर्णय घेईल, असे मुंबई भाजपचे प्रभारी, आमदार अतुल भातखळकर यांनी सांगितले. शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्याशी अनेकदा संपर्काचा प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकला नाही.

मुंबई महापालिका निवडणुकीत राजकीय युती किंवा सहकार्य कोणाशी करायचे, कसे करायचे, याबाबत सर्व निर्णय मनसे प्रमुख राज ठाकरे घेतील.

-संदीप देशपांडे, माजी नगरसेवक, मनसे

मनसेशी युतीची कोणतीही चर्चा झालेली नाही. शिवाय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाबरोबरही जागावाटप झालेले नाही.

-आशीष शेलार, मुंबई भाजप अध्यक्ष

शिवसेना-शिंदे गट संघर्ष रस्त्यावर

मुंबई : अनंत चतुर्दशीला प्रभादेवी परिसरात शिवसेना आणि शिंदे गटातील कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याने मुंबई पालिका निवडणुकीच्या तोंडावर संघर्षांची पहिली ठिणगी पडली आहे. शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप करत त्यांच्यावर कारवाईसाठी शिवसेना आक्रमक झाली. शिंदे गटाला आक्रमक उत्तर देणाऱ्या शिवसैनिकांची जामिनावर सुटका झाल्यानंतर शिवसैनिक हेच ब्रह्मास्त्र असल्याच्या शब्दांत त्यांची पाठ थोपटत आक्रमक भूमिकेचे संकेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्याने शिवसेना-शिंदे गटातील संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे आहेत.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना-शिंदे गटात जोरदार राजकीय संघर्ष सुरू झाला असून, दसरा मेळावा कोणाचा यावरून कुरघोडीचे राजकारण सुरू आहे. अशा तणावाच्या वातावरणात अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जनाच्या वेळी प्रभादेवी परिसरात शिवसेना आणि शिंदे गटाने शेजारी-शेजारी व्यासपीठ उभारले होते. त्यावेळी राजकीय टोलेबाजीतून त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची होऊन हाणामारी झाली. शिवसैनिकांनी शिंदे गटातील शाखाप्रमुख संतोष तेलवणे यांना मारहाण केल्याप्रकरणी सुमारे १२ शिवसैनिकांसह इतर २५ जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल झाला. शिवसेना विभागप्रमुख महेश सावंत व चार शिवसैनिकांना पोलिसांनी अटक केली. तत्पूर्वी, शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर तिकडे आले व त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यातून दोन्ही गटांतील वातावरण पेटले होते. शिवसैनिकांना अटक झाल्याचे कळताच शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, आमदार सुनील शिंदे, सचिन अहिर, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पोलीस ठाण्याकडे धाव घेतली. शिवसेना-शिंदे गटातील कार्यकर्त्यांमधील भांडणावेळी पोलीस ठाण्याच्या आवारात शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केल्याचा आरोप शिवसेनेने केला. त्यांच्यावर कारवाईसाठी शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे राजकीय वातावरण तापले. एकतर्फी कारवाई चालणार नाही. सत्तेचा गैरवापर करून शिवसैनिकांवर कारवाई झाली आहे. शिवसैनिक दादागिरी सहन करत नाहीत व करणारही नाहीत, असा इशारा अंबादास दानवे यांनी दिला. शिवसेना कार्यकर्त्यांवर चोरीचा खोटा गुन्हा दाखल केला असून तो काढून घेण्याची व गोळीबार करणाऱ्या आमदार सदा सरवणकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी आम्ही केली. आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मग खरी शिवसेना काय आहे, हे ज्यांना कुणाला पाहायचे आहे त्यांना कळेल, असा इशारा अरविंद सावंत यांनी दिला. ठाकरे सरकारने गुंडांचा बंदोबस्त केला होता. त्यांच्या कारकीर्दीत असे कृत्य करण्याची कुणाची हिंमत झाली नाही. आता सत्ताधारी आमदारच अशी कृत्ये करत आहेत, असे सावंत म्हणाले. अखेर शिवसैनिकांवरील चोरीचा आरोप हटवण्यात आला आणि त्यांची जामिनावर सुटका झाली. 

 जामिनावर सुटका झालेल्या शिवसैनिकांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली. शिवसेना तुमच्या पाठिशी आहे. शिवसैनिक हेच शिवसेनेचे ब्रह्मास्त्र आहेत, अशा शब्दांत ठाकरे यांनी या शिवसैनिकांचे समर्थन केले. त्यामुळे आता मुंबई महापालिकेसाठी शिवसेना आणि शिंदे गटातील राजकीय संघर्षांचा भडका रस्त्यावर उडण्याची चिन्हे आहेत.

गोळीबाराचा आरोप सरवणकर यांनी फेटाळला

माझ्याकडे परवाना असलेली बंदूक आहे. पण शस्त्रधारी सुरक्षारक्षक माझ्याबरोबर असताना मी बंदूक बागळतच नाही. मी गोळीबार केल्याचा आरोप खोटा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता वाढत असल्याने आम्हाला बदनाम करण्यासाठी हा आरोप करण्यात आला आहे. विसर्जनावेळी कार्यकर्त्यांनी एकमेकांना राजकीय पातळीवर डिवचल्याने हा वाद झाला. पूर्वी एकाच कुटुंबात असणारे कार्यकर्ते आहेत. आता वेगळे झालो असलो तरी हिंदूंच्या सणावेळी आपल्यातच असे वाद होणे योग्य नाही, अशी भूमिका आमदार सदा सरवणकर यांनी मांडली.

पालिकेचे रण पेटले..

प्रभादेवी येथील हाणामारीप्रकरणी शिवसैनिकांना अटक झाल्याचे कळताच खासदार अरविंद सावंत, अंबादास दानवे आदींनी पोलीस ठाण्याकडे धाव घेतली. नंतर जामिनावर सुटका झालेल्या शिवसैनिकांनी ‘मातोश्री’वर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ठाकरे यांनी या शिवसैनिकांचे समर्थन केले. शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेमुळे पालिका निवडणुकीत हा संघर्ष तीव्र होण्याचे संकेत आहेत.