पुढीलवर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. राज्यात ४८ लोकसभेच्या जागा आहेत. त्यासाठी महाविकास आघाडी आणि भाजपा-शिंदे गटाने कंबर कसली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे गटाबाबत मोठं विधान केलं आहे. “शिंदे गटातील खासदारांना भाजपाच्या तिकीटावर उभं राहायचं आहे,” असं जयंत पाटील म्हणाले आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “यापूर्वी आम्ही ज्या लोकसभेच्या जागा लढवल्या होत्या, तेथील नेत्यांशी चर्चा करत आढावा घेण्याचं काम केलं,” असं जयंत पाटलांनी सांगितलं.




हेही वाचा : “पूर्ण ठाकरे गट असंतुष्ट आहे”, देवेंद्र फडणवीसांच्या विधानावर विनायक राऊतांचं प्रत्युत्तर; म्हणाले…
“…म्हणून शिंदे गटाची पंचायत”
“तसेच, एकनाथ शिंदे यांच्याबरोबर असलेले खासदार शिंदेंच्या तिकीटावर उभे राहण्यास इच्छूक नाहीत. बऱ्याच लोकांना भाजपाच्या तिकीटावर उभारण्याची इच्छा आहे. त्यामुळे शिंदे गटाची पंचायत झाली आहे. तसं झालं तर, एकनाथ शिंदेंबरोबर असलेला शिवसैनिक उद्धव ठाकरेंकडं जाण्याची शक्यता आहे,” असं जयंत पाटलांनी म्हटलं.
“हा प्रश्न फडणवीसांना विचारला तर…”
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. याबद्दल विचारल्यावर जयंत पाटील म्हणाले, “हा प्रश्न फडणवीसांना विचारला तर जास्त बरे होईल. मला याबद्दल काहीच माहिती नाही. ते का गेले? त्यांना राज ठाकरेंच्या मदतीची आवश्यकता आहे किंवा राज ठाकरेंशिवाय जमणार नाही, यांची उत्तर फडणवीस देतील.”
हेही वाचा : राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या भेटीवर शिंदे गटातील नेत्याची प्रतिक्रिया; म्हणाले, “जर…”
“लवकरच महाविकास आघाडीची बैठक”
महाविकास आघाडीची बैठक कधी होणार आहे? असं विचारल्यावर जयंत पाटलांनी म्हटलं की, “लवकरच महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. शिवसेना आणि काँग्रेसकडून चाचपणी करण्यात येत आहे. आठवड्यात चाचपणी झाल्यावर लवकरात लवकर बैठक घेण्याचा प्रयत्न करू.”