scorecardresearch

धक्क्याची निर्मिती, एकाच वेळी २० बोटी उभ्या करण्याची क्षमता; जलवाहतुकीवरील ताण लवकरच हलका

गेट वे ऑफ इंडिया येथील प्रवासी जलवाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी रेडिओ क्लब, अपोलो बंदर येथे नवीन प्रवासी धक्का (जेट्टी) बांधण्याचा निर्णय महाराष्ट्र सागरी मंडळाने घेतला आहे.

मंगल हनवते, लोकसत्ता

मुंबई : गेट वे ऑफ इंडिया येथील प्रवासी जलवाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी रेडिओ क्लब, अपोलो बंदर येथे नवीन प्रवासी धक्का (जेट्टी) बांधण्याचा निर्णय महाराष्ट्र सागरी मंडळाने घेतला आहे. या धक्क्यावर १० ठिकाणी एकाच वेळी २० प्रवासी बोटी उभ्या करता येतील, अशी व्यवस्था उभारण्यात येणार आहेत. या नव्या व्यवस्थेनुसार धक्का उभारणीचा सुधारित प्रस्ताव नुकताच मंडळाने केंद्र सरकारला पाठविला आहे.

गेट वे ऑफ इंडिया येथून जलप्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून भविष्यात प्रवासी संख्येत प्रतिवर्ष १० टक्क्यांनी वाढ होईल, असा मंडळाचा अंदाज आहे. दरवर्षी येथून २६ लाख प्रवासी प्रवास करतात. येथे केवळ दोनच धक्के असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. ही बाब लक्षात घेत सागरी मंडळाने गेट वे ऑफ इंडियावरील ताण कमी करण्यासाठी अपोलो बंदल परिसरातील रेडिओ क्लबजवळ एक मोठा धक्का बांधण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सैनी यांनी दिली.

‘सागरमाला’ प्रकल्पांतर्गत या धक्क्याच्या उभारणीचा प्रस्ताव केंद्र सरकारने मंजूर केला. या प्रस्तावानुसार या धक्क्यावर एकाच वेळी सहा ठिकाणी बोटी उभ्या करण्यासाठी व्यवस्था करण्यात येणार होती. त्यासाठी फेब्रुवारीमध्ये निविदा मागविण्यात आल्या. मात्र आता या धक्क्यावर सहाऐवजी १० ठिकाणी २० बोटी उभ्या करण्याची सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यादृष्टीने धक्क्यावर बांधकाम करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे केंद्र सरकारने सुधारित प्रस्ताव सादर करण्याची सूचना केली होती. त्यानुसार सुधारित प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आल्याचे सैनी यांनी सांगितले.

 सुधारित प्रस्तावानुसार या प्रकल्पाचा अंदाजित खर्च १६२ कोटी रुपयांवर पोहोचला असून २५,११६.२८ चौ.मी. जागेवर धक्का विकसित करण्यात येणार आहे. बोटीवरून प्रवाशांना उतरण्या- चढण्यासाठी मुख्य धक्क्याला जोडलेले प्रत्येकी ५५० मीटर लांबीचे १० धक्के बांधण्यात येणार असून प्रवासी निवारा (पॅसेंजर टर्मिनल), वाहनतळ आदी सुविधाही यात असणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे येथे एकाच वेळी २० बोटी उभ्या करता येणार आहेत. असा हा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.

मंजुरी मिळाली की फेब्रुवारीमध्ये काढण्यात आलेली निविदा रद्द करून नवी निविदा काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. प्रस्तावाला लवकरच मंजुरी मिळेल अशी आशा मंडळाला असून त्यानुसार जून/जुलैमध्ये नव्याने निविदा काढण्यात येण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करत प्रत्यक्ष जेट्टीच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. काम सुरू झाल्यापासून दोन वर्षांत काम पूर्ण करण्याचा मंडळाचे नियोजन आहे. या धक्क्याची उभारणी झाल्यानंतर अलिबाग, बेलापूर, एलिफंटाला जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

नव्या जेट्टीची वैशिष्टय़े

  • २५११६.२८ चौ.मी. जागेवर जेट्टी
  •  एका वेळी २० बोटी उभ्या राहणार
  •  प्रवासी निवारा, वाहनतळ आदी सुविधांचाही समावेश
  •  जून/जुलैमध्ये सुधारित निविदा
  •  काम सुरू झाल्यापासून दोन वर्षांत काम पूर्ण करण्याचे नियोजन
  • प्रकल्प खर्च १६२ कोटी रुपये

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shipping ease creation new hull port apollo capacity 20 boats migrant push gateway of india emigration chief executive officer amy

ताज्या बातम्या