मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) खासदार पार्थ पवार यांच्या कंपनीशी संबंधित पुणेस्थित मुंढवा येथील जमीन खरेदी घोटाळा प्रकरणी अटकेत असलेली व्यावसायिक शीतल तेजवानी हिला उच्च न्यायालयाने सोमवारी जामीन मंजूर केला. शीतल हिला यापूर्वी दोन प्रकरणांत जामीन मंजूर झाला आहे. या प्रकरणीही तिला जामीन मंजूर झाल्याने येरवडा कारागृहातून बाहेर पडण्याचा तिचा मार्ग मोकळा झाला आहे.

या कथित जमीन आणि बँकिंग फसवणुकीप्रकरणी तेजवानी हिच्याविरुद्ध तीन गुन्हे दाखल करण्यात आले होते व तिला अटक करण्यात आली होती. या तिन्ही प्रकरणांत तिने उच्च न्यायालयात धाव घेतली होती व तिची अटक बेकायदा ठरवण्याची मागणी केली होती. न्यायालयाने एप्रिल महिन्यात तिच्या याचिकेवर निर्णय देताना तीन प्रकरणांपैकी मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणातील तेजवानी हिची अटक वैध ठरवली होती.

तर उर्वरित दोन बँक फसवणूक प्रकरणातील तिची अटक बेकायदा ठरवून जामीन मंजूर केला होता. जवळपास ३०० कोटी रुपयांच्या मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात तेजवानी हिची अटक वैध ठरवताना गंभीर आर्थिक गुन्ह्यांमधील अटक प्रक्रियेत घटनात्मक हमींचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले होते.

तेजवानी हिने या प्रकरणात जामिनाच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायमूर्ती अश्विन भोबे यांच्या एकलपीठापुढे तिच्या याचिकेवर सविस्तर सुनावणी झाली. त्यानंतर, न्यायालयाने तिची याचिका योग्य ठरवून तिला जामीन मंजूर केला.

प्रकरण काय ?

पुणे पोलिसांनी तेजवानी हिला याप्रकरणी ३ डिसेंबर २०२५ मध्ये अटक केली होती. मुंढवा येथील सुमारे ४० एकर जमीन पार्थ पवार यांच्याशी संबंधित कंपनीसाठी खरेदी करण्यात आल्याचा आरोप आहे. या व्यवहाराची चौकशी सुरू झाल्यानंतर पोलिसांनी तेजवानी हिची मुख्य सूत्रधार म्हणून दोनवेळा चौकशी केली होती. या प्रकरणात सुमारे १,८०० कोटी रुपये मूल्याची जमीन अवघ्या ३०० कोटी रुपयांत खरेदी केल्याचा आरोप होता. तसेच या व्यवहारासाठी केवळ ५०० रुपयांची मुद्रांक शुल्क भरल्याचाही दावा करण्यात आला होता.