मुंबई : मध्य रेल्वेवरील शीव रेल्वे स्थानकाजवळील व रेल्वे मार्गावरील ब्रिटिशकालीन, १११ वर्षे जुन्या उड्डाणपुलावर लवकरच हातोडा पडणार आहे. मात्र याबाबतचा निर्णय अनंत चतुर्दशीनंतर मध्य रेल्वे आणि वाहतूक पोलीस विभागाच्या संयुक्त बैठकीनंतर घेण्यात येणार असून त्यानंतर रेल्वेगाडय़ांचे आणि वाहनांचे नियोजन ठरेल.
वांद्रे-कुर्ला संकुल, कुर्ला एलबीएस मार्ग, धारावी आणि शीव यांना जोडणारा शीव स्थानकाच्या सीएसएमटी दिशेकडील उड्डाणपूल अत्यंत महत्त्वाचा आहे. या पुलावरून दररोज सुमारे दीड लाखांहून अधिक वाहने जातात. मात्र हा पूल जीर्ण झाल्याने, कोणताही अनुचित प्रकार घडू नये. तसेच मध्य रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेसाठी पुलाखालून जाण्यासाठी जागा उपलब्ध व्हावी. यासाठी हा पूल तोडून नवीन पूल बांधण्यात येईल. मात्र त्यासाठी रस्ते वाहतुकीला पर्यायी मार्ग आणि मध्य रेल्वेवरील ब्लॉक यांचे नियोजन करणे आवश्यक आहे. त्यामुळे मध्य रेल्वे व वाहतूक पोलीस विभागाची संयुक्त बैठक अनंत चतुर्दशीनंतर होईल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.




- जुना उड्डाणपूल पाडून तेथे ५१ मीटर लांबीचा उड्डाणपूल बांधण्यात येईल.
- रेल्वे मार्गापासून पुलाची उंची जवळपास ५.४ मीटर ठेवली जाईल.
- पावसाळय़ात रेल्वे रूळ पाण्याखाली जाऊ नयेत यासाठी रुळांची उंची वाढवण्यात येईल.