मुंबई : भाजपचे नेते मोहित कंभोज यांच्या गाडीवर ‘मातोश्री’ परिसरात शिवसेना कार्यकर्त्यांनी शुक्रवारी रात्री हल्ला केला. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून कार्यकर्त्यांना रोखले. खासदार नवनीत राणा यांनी ‘मातोश्री’पुढे हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिल्यानंतर वातावरण तापले होते. शिवसेना कार्यकर्ते त्या परिसरात मोठय़ा संख्येने उपस्थित होते. कंभोज मातोश्री बंगल्यापुढे गाडीतून उतरले आणि ध्वनिचित्रमुद्रण करीत होते. कंभोज पाहणी करीत असल्याचा संशय शिवसेना कार्यकर्त्यांना आल्याने ते त्यांच्यावर धावून गेले.
आपण एक विवाह समारंभ आटोपून चाललो होतो. आमदार प्रसाद लाड यांच्या गाडीतून उतरून माझ्या गाडीत बसण्यासाठी रस्त्यावर उतरलो होतो, असा दावा कंभोज यांनी केला. शिवसेना कार्यकर्त्यांनी कंभोज यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. काही कार्यकर्त्यांकडे बॅट आणि अन्य साहित्य होते. त्यांनी गाडीची तोडफोड केल्याचा दावा कंभोज यांनी केला. कंभोज मातोश्री पुढेच गाडीतून का उतरले, असा सवाल शिवसेना कार्यकर्त्यांनी केला.