scorecardresearch

शिवसेना कार्यकर्ते बाबरी मशीद पाडण्यात सहभागी; अडवाणींच्या वक्तव्याचे शिवसेनेकडून पुरावे

शिवसेना नेते आणि कार्यकर्ते ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यामध्ये सहभागी होते, असे प्रतिपादन करीत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या ध्वनिचित्रफितीतील वक्तव्याचे पुरावे सादर केले.

मुंबई : शिवसेना नेते आणि कार्यकर्ते ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यामध्ये सहभागी होते, असे प्रतिपादन करीत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या ध्वनिचित्रफितीतील वक्तव्याचे पुरावे सादर केले. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राममंदिर आंदोलनातील शिवसेनेच्या सहभागाबाबत सवाल उपस्थित केल्याने राऊत यांनी फडणवीस त्या वेळी कुठे होते, असा सवालही उपस्थित केला.

अडवाणी यांच्या २९ डिसेंबर २०००च्या मुलाखतीतील तपशील राऊत यांनी दिला आहे. बाबरी मशीद पाडणे, ही खूप मोठी चूक होती, यात काहीही शंका नाही. बाबरी मशिदीचा वादग्रस्त ढाचा पाडण्यासाठी वर चढलेल्या कारसेवकांना रोखून खाली उतरविण्यासाठी मी पहिल्यांदा उमा भारती यांना तिथे पाठविले. पण कारसेवक आपले ऐकत नसून काही जण मराठीत बोलत असल्याचे उमाभारती यांनी सांगितल्यावर मी प्रमोद महाजनांना पाठविले होते, पण कारसेवकांनी त्यांचेही न ऐकल्याने ते परतले. मला तेथे जाण्याची परवानगी पोलिसांनी दिली नाही, असे ध्वनिचित्रफितीत अडवाणी यांनी म्हटले होते.

शिवसेना नेते खासदार सतीश प्रधान, मोरेश्वर सावे, विद्याधर गोखले यांच्यासह अनेक नेते व शिवसेना कार्यकर्ते राममंदिर आंदोलनात सहभागी झाले होते. शिवसेना भवनमध्ये विशेष नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला होता. माझी अयोध्या खटल्यात चार वेळा साक्ष झाली होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह काही शिवसेना नेत्यांवर याप्रकरणी आरोप ठेवण्यात आले होते, असे राऊत यांनी स्पष्ट केले.

सतीश प्रधान आरोपी

बाबरी मशीद पाडण्यात आली तेव्हा शिवसेनेचा कोणीही नेता उपस्थित नव्हता, असे फडणवीस यांनी म्हटले असले तरी बाबरी मशीद पाडण्याच्या प्रकरणात लालकृष्ण अडवाणी यांच्यासह कटाच्या आरोपाखाली शिवसेना नेते व ठाण्याचे माजी महापौर सतीश प्रधान यांच्या विरोधातही गुन्हा दाखल झाला होता. अडवाणी यांच्यासह प्रधान व अन्य नेत्यांची  तीन वर्षांपूर्वी निर्दोष सुटका झाली होती.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shiv sena activists involved demolition babri masjid evidence advani statement shiv sena ysh

ताज्या बातम्या