शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महापालिकेवर १ जुलै रोजी मोर्चा काढला जाणार आहे. या विराट मोर्चाचा टीझर ठाकरे गटाने सोशल मीडियावर शेअर केला आहे. मुंबई महापालिकेत रस्ते कामात, खडी आणि वेडिंग मशीनच्या घोटाळ्यासह अनेक घोटाळे झाले असल्याचा आरोप करत ठाकरे गटाने मोर्चाची हाक दिली आहे. दरम्यान, ठाकरे गटाने या मोर्चाचा जो टीझर शेअर केला आहे, त्यात त्यांनी मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार कसा झाला आणि किती रक्कमेचा झाला याची माहिती दिली आहे.
या मोर्चाची ठाकरे गटाकडून तयारी सुरू आहे. आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढला जाणार आहे. दरम्यान, काही वेळापूर्वी आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बातचित केली. यावेळी त्यांनी मोर्चाबद्दलची माहिती दिली. आदित्य ठाकरे म्हणाले, मुंबई महापलिकेत जो भ्रष्ट्राचार सुरू आहे, जे घोटाळे गेल्या वर्षभरात झाले आहेत त्याविरोधात आमचा हा मोर्चा असेल. आपण एक वर्ष झालं पाहत आहोत की, मुंबईतला रस्ते घोटाळा असेल, स्ट्रीट फर्निचर घोटाळा असेल, खडीचा घोटाळा असेल अथवा वेंडिग मशीनचा घोटाळा यावर बोलण्यासाठी, हे सगळे प्रश्न मुंबईकरांसमोर मांडण्यासाठी शिवसेनेकडून हा मोर्चा काढला जाईल.
हे ही वाचा >> मुंबई महापालिका कार्यालयात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा राडा, अधिकाऱ्यांना मारहाण, पोलीस कारवाईच्या तयारीत
मुंबई महापालिकेवर गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेची सत्ता आहे, मग आता मोर्चा काढायची वेळ का आली असा प्रश्न शिंदे गटाकडून उपस्थित केला जात आहे. हाच प्रश्न आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिंनी आदित्य ठाकरे यांना विचारला. त्यावर आदित्य ठाकरे म्हणाले, गद्दारांनी घोटाळे केले म्हणून हा मोर्चा काढावा लागतोय. गेल्या वर्षभरात गद्दारांनी महापालिकेत जो घोळ घालून ठेवलाय, भ्रष्टाचार केलाय त्याविरोधात हा मोर्चा आहे. हा सगळा कारभार मुंबईकरांसमोर मांडण्यासाठी हा मोर्चा असणार आहे.