भंडारा-गोंदिया जिल्हा परिषदेत भाजपचा दारुण पराभव झाल्यानंतर शिवसेनेने मित्र पक्ष भाजपवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. आजच्या राजवटीपेक्षा आधीचे लोक बरे होते या वैफल्यातून भंडारा-गोंदिया या ठिकाणचा निकाल लागला असेल तर महाराष्ट्राचे समाजमन ओळखून सरकारला पावले उचलावी लागतील नाहीतर विदर्भाचाही भंडारा-गोंदिया होण्यास वेळ लागणार नाही, असे मत शिवसेनेच्या ‘सामना’ या मुखपत्राच्या अग्रलेखातून व्यक्त करण्यात आले आहे. विदर्भाचा संपूर्ण कौल लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपच्या बाजूने होता. विधानसभा निवडणुकीवेळी संपूर्ण विदर्भ भाजपच्या बाजूने उभा राहिला होता मात्र, भंडारा-गोंदिया जिल्हा परिषदेचे निकाल डोळे उघडणारा आहे. भंडारा-गोंदियातील जनतेने काँग्रेस-राष्ट्रवादीला स्विकारणे हा शुभशकून नसून त्यादृष्टीने सरकारला पावले उचलावी लागतील, असा सल्ला शिवसेनेने भाजपला देऊ केला आहे. १५ जूनपर्यंत शेतकर्‍यांच्या नुकसानीचा पंचनामा वगैरे होऊन त्यांच्या आधीच्या कर्जाचे पुनर्गठन होऊन त्यांना कर्ज मिळेल असा मुख्यमंत्र्यांचा शब्द होता, पण मदत नाही, कर्ज नाही व चूलही पेटत नसल्याचे म्हणत शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांच्यावरही शरसंधान केले आहे.