महापौरांविषयी अनुदार उद्गारप्रकरणी आशीष शेलार वादाच्या भोवऱ्यात

मुंबई : भाजपचे आमदार आशीष शेलार यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरून शिवसेना-भाजपमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. शेलार यांच्या वक्तव्याबाबत महापौरांनी गृहमंत्री तसेच पोलिसांत तक्रार केली असून राज्य महिला आयोगानेही याची दखल घेत याबाबतचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्याची सूचना पोलीस आयुक्तांना केली आहे. दुसरीकडे भाजपने मात्र शेलार यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात येत असल्याचे सांगत सारवासारव केली आहे.

गेल्या मंगळवारी वरळीच्या बीडीडी चाळीतील एका घरात झालेल्या स्वयंपाकाच्या गॅस सििलडरच्या स्फोटात तीन महिन्यांच्या बाळासह तिघांचा मृत्यू झाल्याने पालिकेतील राजकीय वातावरण तापले आहे. गेल्या आठवडय़ात पार पडलेल्या पालिका सभागृहाच्या बैठकीत या विषयावरून शिवसेना आणि भाजपचे नगरसेवक भिडले होते. त्यावरून सेना व भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या होत्या. त्यातच आमदार आशीष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर आरोप केले होते. ‘या दुघर्टनेत तीन महिन्यांचे बाळ नायर रुग्णालयात दगावले. मात्र या घटनेला ७२ तास झाल्यानंतर महापौर किशोरी पेडणेकर रुग्णालयात पोहोचल्या. ७२ तास कुठे निजल्या होतात?’ असा सवाल शेलार यांनी केला होता. या वक्तव्यावरून आता नवीन संघर्ष सुरू झाला आहे.

‘शेलार यांचे वक्तव्य हे महिलेचा अपमान करणारे असून आपण कोणाविषयी बोलतोय याची त्यांना जाणीव नाही, ते भ्रमिष्ट झाले आहेत,’ अशी प्रतिक्रिया महापौरांनी दिली. याप्रकरणी पेडणेकर यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनाही पत्र पाठवले आहे. शेलार यांच्या वक्तव्याचा निषेध करत या वक्तव्यामुळे माझ्यासह समस्त महिलावर्गाचा अपमान झाला आहे, असे महापौरांनी या पत्रात म्हटले आहे. महिला आयोगानेही याप्रकरणी पोलीस आयुक्तांना पत्र लिहून या प्रकरणी वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

‘विधान व्यक्तीबाबत नाही’

शेलार यांच्या विधानावरून वादंग होऊ लागल्यानंतर भाजपने सारवासारव केली. आशीष शेलार यांच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा आरोप भाजपने केला आहे. चुकीचा अर्थ काढून तसा मजकूर समाज माध्यमांवर टाकणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी भाजपच्या नगरसेविकांनी कायदा सुव्यवस्था सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची भेट घेऊन केली.

आशीष शेलार यांनी केलेली टीका ही सत्ताधारी शिवसेनेतील सर्वच पदसिद्ध अध्यक्ष व पदाधिकारी यांच्याबाबत आहे. ती कोणाही एका व्यक्तीबाबत नाही. चित्रफितीमधील विशिष्ट तुकडाच विचारात घेऊन वस्तुस्थितीचा विपर्यास करीत मुंबईच्या महापौरांचा अपमान काही जण समाजमाध्यमांवर करीत असल्याचा आरोप भाजपने केला आहे.

अनाथ बालकाची जबाबदारी शिवसेना घेणार

 वरळी दुर्घटनेत एकाच कुटुंबातील तीन जण गेल्या आठवडय़ाभरात दगावले आहेत, तर पाच वर्षांचा मुलगा रुग्णालयात उपचार घेत आहे. या अनाथ झालेल्या बालकाची संपूर्ण जबाबदारी शिवसेना घेईल, अशी ग्वाही किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.