मुंबई : शिवसेनेतून अनेक नेते बाहेर पडले, परंतु बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा शिवसैनिक हा नेत्यांसोबत कधीच राहात नाही, तर तो शिवसेनेबरोबरच राहतो, हा इतिहास आहे आणि पुढेही तसेच घडेल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिला. एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांची शिवसेना फोडली, असा संदेशही महाराष्ट्राच्या जनतेत गेल्याची जाणीव त्यांनी करुन दिली.

विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील विश्वासदर्शक ठराव बहुमताने मंजूर झाला. त्यानंतर सभागृहात मुख्यमंत्रयांच्या अभिनंदानाचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यावर बोलताना अजित पवार यांनी नव्याने स्थापन झालेल्या एकनाथ शिंदे- देवेंद्र फडणवीस सरकारवर आणि शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांवर जोरदार टोले बाजी केली.

सर्वोच्च न्यायालयात ११ जुलैला शिवसेनेच्या बंडखोर आमदारांबाबत निकाल येणार आहे. तरीही अध्यक्षपदाची निवडणूक घेतली गेली. अपात्रतेचे प्रकरण असताना विश्वासदर्शक ठराव का मांडण्यात आला असा सवालही त्यांनी केला. नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, त्यानंतर गेली सव्वा वर्ष आघाडीच्या वतीने अध्यक्ष निवडणुकीसाठी परवानगी द्यावी अशी राज्यपालांकडे मागणी करीत होतो. त्यावेळी ती मान्य केली नाही, मात्र आता अध्यक्षांची निवड ताबडतोब झाली. लोकांच्या मनात त्याबद्दल शंका निर्माण झाली आहे, असे पवार यांनी निदर्शनास आणले. ज्या, ज्या वेळी बाळासाहेबांची शिवसेना फोडण्याचा प्रयत्न झाला किंवा करण्यात आला, त्यानंतर पक्ष फोडणारा कधी निवडून आला नाही ही वस्तुस्थिती आहे, हे उदय सामंत व गुलाबराव पाटील तुम्ही लक्षात ठेवा, असा टोलाही त्यांनी हाणला.