ट्वेन्टी-२० विश्वचषकातील धरमशाला येथे होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्यासाठी सुरक्षेची हमी देणाऱ्या सरकारवर शिवसेनेने टीकेचे आसूड ओढले आहेत. धर्मशालेतील क्रिकेटच्या मैदानावर पाकड्यांच्या पादुकांचे पूजन झाले नाही तर देशावर संकटाचा पहाड कोसळणार आहे काय? , अशी जहरी टीका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तील अग्रलेखातून करण्यात आली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजप यांच्यात द्वंद्व रंगण्याची शक्यता आहे. येत्या १९ मार्चला हिमाचल प्रदेशातील धरमशाला मैदानावर भारत-पाक सामन्याबाबत सुरक्षेच्या मुद्द्यावरून अद्यापही साशंकता आहे. येथील राज्य सरकारचा या सामन्याला विरोध असूनही केंद्र सरकार मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहे. या पार्श्वभूमीवर अयोध्येत रामाच्या पादुका आजही बेवारस आहेत, पण धर्मशालेत पाकड्यांच्या पादुकांचे पूजन दिल्लीश्‍वर करणारच असतील तर देशाची जनता वीरभद्र बनून जोडे मारल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका या अग्रलेखातून करण्यात आली आहे. याशिवाय, राज्यकर्त्यांनी या देशात धर्म नावाची काही गोष्ट शिल्लक ठेवली आहे काय, असा सवालही सेनेकडून उपस्थित करण्यात आला आहे.
धर्मशाला, कांगडा येथे पाकबरोबर क्रिकेट खेळणे म्हणजे सैनिकांच्या बलिदानांचा अपमान ठरेल. कांगडा परिसरात अनेक सैनिक राहतात. शहीद सैनिकांची कुटुंबे राहतात. त्यांच्या भावनांचा आदर राखणे महत्त्वाचे असल्याचे शिवसेनेने सांगितले आहे. यापूर्वीही पाकिस्तानी गझल गायक गुलाम अलींचे कार्यक्रम आणि पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शिद मेहमूद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या मुद्द्यावरून शिवसेना-भाजप आमनेसामने आले होते.
भारत-पाकिस्तान सामना धरमशालामध्येच