शिवसेना व काँग्रेसचा फडणवीस-मलिक यांना सल्ला

मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांच्यात सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांवर महाविकास आघाडीतील शिवसेना आणि काँग्रेसने नापसंती व्यक्त करीत ही चिखलफेक थांबवावी, असा सल्ला उभयतांना दिला आहे.

परस्परांवर सुरू झालेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे महाराष्ट्राची बदनामी होत आहे. हे थांबले पाहिजे, अशी भूमिका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मांडली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही दोन्ही बाजूंनी पातळी सोडून सुरू झालेल्या आरोपांवर नापसंती व्यक्त करीत जे आरोप करीत आहेत त्यांनी पुरावे द्यावेत, असे आवाहन केले. काँग्रेस पक्षासाठी इंधन दरवाढ, वाढती महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

नवाब मलिक हे संतापातून आरोप करीत आहेत. त्यांचा राग समजू शकतो; पण कोणी किती ताणायचे याचाही विचार झाला पाहिजे, असे मत मांडत संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आदी वरिष्ठ नेत्यांनी लक्ष घालण्याची आवश्यकता व्यक्त के ली. भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये दैनंदिन सुरू झालेल्या आरोपांवर शिवसेना आणि काँग्रेसने नाराजी व्यक्त के ली आहे.

आरोप-प्रत्यारोप सुरूच

निश्चलनीकरणानंतर मुंबईतील १४ कोटी ५६ लाख रुपयांचे नकली नोटांचे प्रकरण दडपण्यात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हात होता, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते  व राज्याचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला. मुंबईत वांद्रे-कु र्ला संकुलात (बीकेसी) ८ ऑक्टोबर २०१७ रोजी १४ कोटी ५६ लाख रुपये नकली नोटांप्रकरणी इम्रान आलम शेख व रियाज शेख यांना अटक करण्यात आली होती. त्यांना काही दिवसांतच जामीन मिळाला. १४ कोटी ५६ लाख नकली नोटांचे प्रकरण ८ लाख ८० हजार रुपयांचे असल्याचे दाखवून प्रकरण दडपण्यात आले. इतकेच नव्हे तर, या प्रकरणातील आरोपी इम्रान शेख याचा लहान भाऊ  अराफत शेख याला अल्पसंख्याक आयोगाचा अध्यक्ष करण्यात आले होते याकडे मलिक यांनी लक्ष वेधले. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात कुख्यात गुंड मुन्ना यादव याला एका मंडळाचे अध्यक्ष के ले, बांगलादेशी नागरिकांना मुंबईत स्थायिक करणाऱ्या हैदर आजमला मौलाना आझाद मंडळाचे अध्यक्ष के ले. दुहेरी पारपत्र बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला व दाऊद टोळीशी संबंध असलेला रियाज भाटी सतत भाजपच्या कार्यक्रमांमध्ये कसा दिसतो, असा सवालही मलिक यांनी के ला. 

भाजपचे प्रत्युत्तर

नवाब मलिक यांनी मानसिक संतुलन सांभाळावे, अशी टीका करीत भाजप आमदार अ‍ॅड. आशीष शेलार यांनी मलिक यांनी हायड्रोजन बाँब सोडाच, त्यांनाच आता प्राणवायूची गरज लागेल, असे प्रत्युत्तर दिले.

मलिक यांच्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही. कितीही खोदकाम केले तरी आरोप करायलासुद्धा काहीही सापडू शकलेले नाही, असे सांगून शेलार म्हणाले, मुन्ना यादव, हाजी अराफत शेख, हाजी हैदर आझम हे तिघेही भाजपचे कार्यकर्ते असून त्यांना विविध अध्यक्ष पदे देण्यात आली होती. हाजी अराफत शेख व हाजी हैदर आझम यांच्यावर एकही गुन्हा  नसून पूर्णपणे चौकशी केल्यानंतरच त्यांच्या कायदेशीर नेमणुका झाल्या होत्या याकडेही शेलार यांनी लक्ष वेधले. 

फडणवीस यांचा टोला

‘डुकराशी कुस्ती खेळू नये, घाण आपल्यालाच लागते’ या जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्या वचनाचा आधार घेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मलिक यांना प्रत्युत्तर दिले.